(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पाकिस्तानने अकलेचे तारे तोडले, माजी क्रिकेटपटू म्हणाला, शमी-सिराजला दिल्या जाणाऱ्या बॉलची चौकशी करा!
Hasan Raza on Shami : भारतीय वेगवान गोलंदाज अक्षरश: आग ओकत आहेत. भारताची गोलंदाजी पाहून विरोधी संघांना धडकी भरत आहे. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे पाकिस्तानमध्ये वेगळंच 'लॉजिक' लावलं जात आहे.
मुंबई: विश्वचषकात टीम इंडिया (Team India) तुफान फॉर्ममध्ये आहे. वानखेडेवर गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध (India vs Sri Lanka) झालेल्या सामन्यात भारताने भलामोठा विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 358 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. श्रीलंकेला हे आव्हान अजिबात पेलवलं नाही. लंकेचा अख्खा संघ अवघ्या 55 धावांत गारद झाला. भारताने हा सामना तब्बल 302 धावांनी जिंकला. या विजयात फलंदाजांनी जेवढा वाटा उचलला, त्यापेक्षा जास्त चर्चा भारताच्या गोलंदाजांची आहे. टीम इंडियाचा फायरब्रँड गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) 5 विकेट घेत श्रीलंकेचं कंबरडं मोडलं. याशिवाय मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) 3 तर बुमराह आणि रवींद्र जाडेजाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
भारताने आतापर्यंत 7 सामन्यात 7 विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. भारतीय वेगवान गोलंदाज अक्षरश: आग ओकत आहेत. भारताची गोलंदाजी पाहून विरोधी संघांना धडकी भरत आहे. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे पाकिस्तानमध्ये वेगळंच 'लॉजिक' लावलं जात आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू हसन रजाने (Hasan Raza) मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यांना बोलिंगसाठी दिल्या जाणाऱ्या बॉलची चौकशी करण्याची अजब मागणी केली आहे.
शमी-सिराजला दिल्या जाणाऱ्या बॉलची चौकशी करा
हसन रजाने पाकिस्तानात एका टीव्ही शोदरम्यान शमी-सिराजला दिल्या जाणाऱ्या बॉलची चौकशी करण्याची मागणी केली. या शोमध्ये अँकरने हसन रजाला विचारलं, "बॉलमध्ये फरक असतो का? कारण भारतीय गोलंदाजांची बोलिंग एवढी स्विंग होत आहे, ज्यामुळे ते केवळ गोलंदाजीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर खेळतात की काय असं वाटतं"
त्यावर हसन रजा म्हणाला,"जेव्हा टीम इंडियाची गोलंदाजी सुरु होते, तेव्हा DRS चे निर्णयही त्यांच्याच बाजूने जातात. 7-8 DRS असे होते, ज्याचा फायदा भारताला झाला. मात्र शमी आणि सिराज हे अॅलन डोनाल्ड आणि एनटिनीप्रमाणे खतरनाक झाले आहेत. मला वाटतं दुसऱ्या डावात बॉल बदलला जातो. त्यामुळे या बॉलची चौकशी व्हायला हवी. यावर चर्चा व्हायला हवी. कारण मला तर या सर्वावर संशय आहे"
हसन रजाचा पराक्रम, केवळ 7 कसोटीत खेळला!
दरम्यान, हसन रजा हा कोणी मोठा खेळाडू नाही. त्याने पाकिस्तानकडून केवळ 7 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 27 च्या सरासरीने केवळ 235 धावा केल्या होत्या. तर 16 वन डे सामन्यात 242 धावाच त्याच्या नावावर आहेत.
आकाश चोप्राने धुतलं
हसन रजाच्या या अजब मागणीनंतर भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने (Akash Chopra) चांगलंच धुतलं. खरोखरच हा गंभीर शो आहे का? जर नसेल तर कॉमेडी शो किंवा तत्सम नाव द्या, असं आकाश चोप्रा म्हणाला.