70 बिनविरोध निवडीवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल; चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, सांगितलं राज'कारण'
संजय राऊत हे नकारात्मक मानसिकतेचे आहेत, ते समाजात नकारात्मक गोष्टी पसरवत असतात. दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक अधिकाऱ्यांच्या ऑफिस आवारात जे उमेदवार येतात

चंद्रपूर : राज्यात निवडणुकीचा बिनविरोध पॅटर्न नव्याने सुरू झाला असून महापालिका (Election) निवडणुकांमध्ये तब्बल 70 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. या बिनविरोध निवडीवरुन विरोधकांनी सरकारवर, राज्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले असून निवडणूक आयोगानेही याची दखल घेतली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यकर्त्यांवर टीका केली होती. या देशात अटलबिहारी वाजपेयींपासून ते नरेंद्र मोदींपर्यंत कुणीही बिनविरोध निवडून आले नाहीत, असे उदाहरणही संजय राऊत यांनी दिले होते. आता, भाजप (BJP) नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule) यांनी संजय राऊतांच्या टीकेवरुन पलटवार केला आहे. तसेच, देवेंद्र फडणवीसाचं सरकारच आमचा विकास करू शकते, या अजेंड्यावर फॉर्म वापस झाले आहेत, असेही बावनकुळे यांनी म्हटलं.
संजय राऊत हे नकारात्मक मानसिकतेचे आहेत, ते समाजात नकारात्मक गोष्टी पसरवत असतात. दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक अधिकाऱ्यांच्या ऑफिस आवारात जे उमेदवार येतात, त्या सर्वांचे अर्ज स्वीकारण्याची पद्धत आहे. देवेंद्र फडणवीसाचं सरकारच आमचा विकास करू शकते, या अजेंड्यावर फॉर्म वापस झाले आहेत, कोणी कोणावर दबाव टाकू शकत नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
या देशात मोठ्या मोठ्या नेत्यांना बिनविरोध निवडून दिलेलं नाही. अटल बिहारी वाजपेयी बिनविरोध निवडून आले नाहीत, बॅरिस्टर नाथ पै कधी बिनविरोध निवडून आले नाहीत, वसंत दादा पाटील बिनविरोध निवडून आले नाहीत, राम मनोहर लोहिया बिनविरोध निवडून आले नाहीत, नरेंद्र मोदी बिनविरोध निवडून आले नाहीत. मात्र, या महाराष्ट्रात बिनविरोध निवडून आणण्यासाठी साम, दाम दंड भेद वापरून नवीन ट्रेंड सुरू असल्याचा घणाघाती प्रहार संजय राऊत यांनी केला. देशाच्या नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये इतके बिनविरोध लोक कधी निवडून आले नव्हते हे पत्रकारांना आणि राजकीय विश्लेषकांना माहिती आहे आणि लोकांनाही माहिती असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले होते.
राज ठाकरेंच्या सभेतून होणार पोलखोल
ठाणे, कल्याण डोंबिवली, पनवेलसह राज्यात निवडून आलेल्या 70 बिनविरोध निवडून उमेदवारांची सध्या राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामध्ये, सर्वाधिक भाजपचेच (BJP) आहेत. दबाव, पैशाचं आमिष दाखवून उमेदवारांना निवडणुकीतून माघार घ्यायला लावल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे ठाण्यात मनसेच्या एका उमेदवारानेही निवडणुकीतून माघार घेतल्याने मनसैनिकांना हा मोठा धक्का होता, त्यामुळे बिनविरोध झालेले हे उमेदवार कसे निवडून आले आहेत? याची पोलखोल येणाऱ्या सभांच्या माध्यमातून राज ठाकरे (Raj Thackeray) करणार आहेत.




















