(Source: ECI/ABP News/ABP Majha)
AFC Women's Asian Cup : व्हिएतनामची चिनी तैपई संघावर 2-1 ने मात, फिफा विश्वचषक स्पर्धेत प्रवेश
AFC Women's Asian Cup : व्हिएतनामने प्ले ऑफ लढतीत चिनी तैपईला 2-1 ने मात दिली आहे. या विजयासह व्हिएतनामने 2023 साली ऑस्ट्रेलिया -न्यूझीलंडच्या यजमानपदाखाली होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेत थेट प्रवेश मिळवला आहे.
AFC Women's Asian Cup : यंदा भारतात पार पडत असलेल्या एएफसी वुमन्स आशिया कप भारत, 2022 स्पर्धेत (AFC Women's Asian Cup) व्हिएतनामने प्ले ऑफ लढतीत चिनी तैपईला 2-1 ने मात दिली आहे. या विजयासह व्हिएतनामने 2023 साली ऑस्ट्रेलिया -न्यूझीलंडच्या यजमानपदाखाली होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेत थेट प्रवेश मिळवला आहे. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच व्हिएतनामने पात्रता मिळवल्याने त्यांचे चाहते आनंदी आहेत.
नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात व्हिएतनामच्या चेउंग थियू कियूने सातव्या आणि एनग्युयेन थी बिच थूय हिने 56व्या मिनिटाला गोल करत व्हिएतनामच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. चिनी तैपईकडून एकमेव गोल हेइ सुआनने दुसऱ्या सत्रात केला. या पराभवानंतर चिनी तैपई संघ आता इंटर-कॉन्फेडरनेश प्ले ऑफ लढतीत थायलंडविरुद्ध खेळणार आहे. या लढतीत विजय मिळवल्यास 31 वर्षांत पहिल्यांदाच चिनी तैपई संघ फिफा महिला विश्वचषक स्पर्धेची पात्रता गाठतील.
चिनी तैपईला प्रवेशापासून थोडक्यात हुकली
शुक्रवारी झालेल्या सामन्यात चिनी तैपईने थायलंडला 3-0 ने मात दिली होती. त्यामुळे आता विश्वचषक स्पर्धेत पात्रता मिळवण्यासाठी त्यांना व्हिएतानमविरुद्ध विजय अथवा केवळ बरोबरी साधण्याची आवश्यकता होती. परंतु, व्हिएतनामने आक्रमक सुरुवात करत चिनी तैपईला बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पाडले. ज्यामुळे सामन्यात ते विजय किंवा बरोबरी साधू शकले नाहीत.
असा पार पडला सामना
सामन्यात सातव्याच मिनिटाला चिनी तैपईचा बचाव भेदण्यात व्हिएतनामला यश आले. चेउंग थियू कियूने गोल करत व्हिएतनामला 1-0 गोल अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या गोलनंतर व्हिएतनामने आणखी अप्रतिम कामगिरी करत 19 व्या मिनिटालाही गोल करण्याची संधी निर्माण केली. मात्र, चेन-पिंगने व्हिएतनामचे आक्रमण रोखले. यानंतर पहिल्या सत्रात कोणलाही गोल करता आला नाही. चिनी तैपईने दुसऱ्या सत्रात शानदार खेळ करताना गोल केला. 49व्या मिनिटाला सू हेइ सुआनने डाव्या कॉर्नरने गोल करत चिनी तैपईला 1-1 गोल बरोबरी साधून दिली. यावेळी चिनी तैपईने सामन्यावर चांगले नियंत्रण मिळवले. परंतु, 56व्या मिनिटाला एनग्युयेन थी बिच थूय हिने शानदार गोल करत व्हिएतनामला 2-1 गोल असे आघाडीवर नेले. व्हिएतनामने यानंतर भक्कम बचावाचे प्रदर्शन करत अखेरपर्यंत आघाडी कायम राखली आणि विजय मिळवला. या निर्णायक गोलच्या जोरावर व्हिएतनामने फिफा विश्वचषक स्पर्धेची पात्रता मिळवली.
हे देखील वाचा-
- AFC Women's Asian Cup : जपानचा थायलंडवर विजय; उपांत्य फेरीत धडक
- AFC Women's Asian Cup : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला मात देत कोरिया रिपब्लिक उपांत्य फेरीत
- Women Asia Cup : तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात भारताची चीनवर मात, कांस्य पदकावर कोरलं नाव
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha