(Source: ECI/ABP News/ABP Majha)
AFC Women's Asian Cup : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला मात देत कोरिया रिपब्लिक उपांत्य फेरीत
AFC Women's Asian Cup : ऑस्ट्रेलिया आणि कोरिया रिपब्लिक यांच्यात अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्या अवघ्या एका गोलने कोरिया रिपब्लिकने विजय मिळवला आहे.
AFC Women's Asian Cup : भारतात सुरु असलेल्या एएफसी वुमन्स आशिया कप 2022 (AFC Women's Asian Cup) या फुटबॉल स्पर्धेच्या कोरिया रिपब्लिक विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना अत्यंत चुरशीचा झाला. कोरिया रिपब्लिकच्या जी सो युन हिच्या अप्रतिम अशा सामन्यातील एकमेव गोलमुळे कोरिया रिपब्लिक संघाने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. हा सामना रविवारी म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मैदानावर झाला.
सामना सुरुवातीपासून अतिशय चुरशीचा सुरु होता. दोन्ही संघाना एकही गोल करता येत नव्हता. सामना संपण्यासाठी दोन मिनिटे शिल्लक असताना जी युन हिने तब्बल 25 यार्डावरून मारलेल्या अफलातून किकने कोरिया रिपब्लिकला विजय मिळवून दिला आहे. कोरियाचा संघ आता सेमीफायनलमध्ये पोहोचला असून त्यांचा सामना चायनीज तैपेई आणि फिलिपिन्स यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.
पूर्वार्धात पेनल्टी हुकल्यानंतर उत्तरार्धात कोरिया रिपब्लिकच्या खेळाडूंनी अधिक आत्मविश्वासाने खेळ केला. उत्तरार्धात खेळ सुरू झाल्यावर सहाव्याच मिनिटाला चोए यु री हिची किक ऑस्ट्रेलियाची गोलरक्षक विल्यम्स हिने अप्रतिम अडवली. त्यानंतर चार मिनिटांनी सो ह्यून हिचे हेडर विल्यम्सनेच सुरेख अडवून कोरिया रिपब्लिकच्या आक्रमकांना निराश केले.
अखेरच्या मिनिटांत कोरिय रिपब्लिक विजयी
सामन्याला 15 मिनिटे बाकी शिल्लक असताना सॅम केर हिचे प्रयत्न फोल ठरत होते. तिचे अनेक प्रयत्न दिशाहीन होते. राखीव खेळाडू म्हणून उतरलेल्या कोर्टनी व्हिने हिने उजव्या बगलेतून सुरेख चाल रचून केर हिच्यासाठी चांगली जागा केली होती. मात्र, केर आज तिच्या लयीत नव्हती. तिची किक बाहेर गेली. त्यानंतर सामन्याला दोन मिनिटे बाकी असताना जी हिने निर्णायक गोल मारला. मैदानात 30 यार्डावर त्याने चेंडूचा ताबा मिळविला. तेथून ती चेंडू घेऊन सुसाट निघाली. परिस्थितीच अंदाज घेत तिने उजव्या बाजूने जोरदार मारलेल्या किकने विल्यम्सला चकवले आणि चेंडू जाळीत गेला.
हे देखील वाचा-
- AFC Women's Asian Cup : जपानचा थायलंडवर विजय; उपांत्य फेरीत धडक
- Women Asia Cup : तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात भारताची चीनवर मात, कांस्य पदकावर कोरलं नाव
- IND vs WI: जाडेजाला संघात स्थान का नाही? बीसीसीआयनं सांगितलं कारण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha