Norway Chess Open: भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञानानंदनं नॉर्वे चेस ओपनचं विजेतेपद जिंकलं!
Norway Chess Open: भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंदनं नऊ फेऱ्यांमध्ये 7.5 गुणांसह नॉर्वेजियन बुद्धिबळ गट अ च्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता ठरला.
Norway Chess Open: भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंदनं नऊ फेऱ्यांमध्ये 7.5 गुणांसह नॉर्वेजियन बुद्धिबळ गट अ च्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता ठरला. अव्वल मानांकित 16 वर्षीय जीएमनं चमकदार गती कायम ठेवली आणि संपूर्ण स्पर्धेत तो अपराजित राहिला. त्यानं शुक्रवारी उशिरा सहकारी भारतीय आंतरराष्ट्रीय मास्टर व्ही प्रणीतवर विजय मिळवून स्पर्धा पूर्ण केली.
प्रज्ञानानंदची दमदार खेळी
प्रज्ञानानंद (इएलओ 2642) दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आयएम मार्सेल एफ्रोइम्स्की (इस्राएल) आणि आयएम जंग मिन सेओ (स्वीडन) यांच्यापेक्षा एक गुण पुढे राहिला. प्रणीत सहा गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर होता पण टायब्रेकच्या कमी गुणांमुळे शेवटच्या टेबलमध्ये सहाव्या स्थानावर घसरला. प्रणित व्यतिरिक्त, प्रज्ञानंदनं व्हिक्टर मिखालेव्हस्की (आठवी फेरी), विटाली कुनिन (सहावी फेरी), मुखमदझोखिद सुयारोव (चौथी फेरी), सेमेन मुतुसोव्ह (दुसरी फेरी) आणि मॅथियास अनेलँड (पहिली फेरी) यांचा पराभव केला. त्यांचे इतर तीन सामने अनिर्णित ठरले.
प्रशिक्षकाकडून प्रज्ञानानंदचं कौतूक
या विजयानंतर प्रज्ञानानंदचे प्रशिक्षक आरबी रमेश यांनी त्याला शुभेच्छा दिल्या "विजयासाठी त्याला शुभेच्छा. तो अव्वल मानांकित होता, त्यामुळं त्यानं स्पर्धा जिंकली यात आश्चर्य नाही. तो एकंदरीत चांगला खेळला. काळ्या मोहऱ्यांसह तीन सामने अर्णित ठरले आणि बाकीचे सामने जिंकले, ज्यामुळं त्याचा आत्मविश्वास वाढला", असं आरबी रमेश यांनी म्हटलं.
प्रज्ञानंद भारतातील सर्वात तरूण ग्रँडमास्टर
प्रज्ञानानंद यांनी वयाच्या 12 वर्षे, 10 महिने आणि 13 दिवसांत ग्रँड मास्टरची पदवी प्राप्त केली. तो भारताचा सर्वात तरुण ग्रँड मास्टर आहे. त्याच वेळी, 2018 मध्ये, तो जगातील दुसरा सर्वात तरुण ग्रँडमास्टर होता. त्याच्या आधी केवळ युक्रेनचा सर्गेई करजाकिन हा 1990 मध्ये वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी ग्रँडमास्टर झाला होता.
हे देखील वाचा-