Pakistan Cricket Team : पाकिस्तान टीम घरात पोहोचताच हादरे सुरुच; पहिला राजीनामा आल्यानंतर आता थेट उचलबांगडी करत करेक्ट कार्यक्रम!
माजी कर्णधार युनूस खान किंवा मोहम्मद हाफीज नवा मुख्य निवड समिती प्रमुख होण्याच्या शर्यतीत आहेत. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज सोहेल तन्वीर आणि वहाब रियाझ निवड समितीचा भाग असू शकतात.
PCB Sacks Entire Selection Committee : पाकिस्तान क्रिकेटमधील गोंधळ कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता संपूर्ण निवड समिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बरखास्त केली आहे. विश्वचषक 2023 मधील पाकिस्तानच्या खराब कामगिरीचा परिणाम क्रिकेट बोर्डावर स्पष्टपणे दिसून येत आहे. याआधी संघाचे मुख्य निवडकर्ता इंझमाम उल हक यांनी राजीनामा दिला होता. आता नवा मुख्य निवड समिती प्रमुखांच्या शर्यतीत युनूस खान, मोहम्मद हाफीज आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
क्रिकेट पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, संघाचा माजी कर्णधार युनूस खान किंवा मोहम्मद हाफीज नवा मुख्य निवड समिती प्रमुख होण्याच्या शर्यतीत आहेत. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज सोहेल तन्वीर आणि वहाब रियाझ निवड समितीचा भाग असू शकतात. निवड समिती बरखास्त केल्यानंतर पीसीबीचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी लाहोरमध्ये युनूस खान, मोहम्मद हाफीज, सोहेल तन्वीर आणि वहाब सिराज यांची भेट घेतली. भेटीचे फोटो पीसीबीच्या अधिकृत सोशल मीडियाद्वारे शेअर करण्यात आली.
Former Pakistan cricketers Younis Khan, Mohammad Hafeez, Wahab Riaz and Sohail Tanvir called on Chairman PCB Management Committee Mr Zaka Ashraf today at Gaddafi Stadium in Lahore. pic.twitter.com/3XJykYU3nf
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 14, 2023
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला हटवण्याची चर्चा
पाकिस्तान क्रिकेट आगामी दोन महत्त्वाचे दौरे आणि टी-20 विश्वचषकासाठी पुन्हा तयारी करत आहे. पाकिस्तानला डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि जानेवारीत न्यूझीलंडचा दौरा करायचा आहे. यानंतर 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपवर लक्ष केंद्रित करावे लागेल. संघ निवडण्याबरोबरच संघाच्या कर्णधारपदाचाही महत्त्वाचा निर्णय नव्या निवड समितीला घ्यावा लागणार आहे.
दुसरीकडे, वर्ल्डकप 2023 मधील खराब कामगिरीनंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला हटवण्याची चर्चा आहे. पाकिस्तानचे सर्व माजी क्रिकेटपटू बाबरला कर्णधारपदावरून हटवण्याच्या समर्थनात आहेत. अशा परिस्थितीत बाबरला कर्णधारपदावरून हटवले जाते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सध्या बाबर तिन्ही फॉरमॅटमध्ये पाकिस्तानचा कर्णधार आहे.
युनूस आणि हाफिज पाकिस्तानचे माजी कॅप्टन
मोहम्मद युनूस पाकिस्तानसाठी कर्णधार म्हणून यशस्वी ठरला आहे. युनूसच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान 2009 मध्ये टी-20 विश्वचषकाचा चॅम्पियन बनला होता. हाफिजने 29 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचा कर्णधारपद भूषवले आहे. अशा स्थितीत नव्या मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी कोणाकडे सोपवली जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या