Tokyo Paralympics 2020: आजचा दिवस भारताच्या नावे! दोन सुवर्णांसह एकूण चार पदकं जिंकली
Tokyo Paralympics: आज टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी चांगला दिवस होता. भारताने आज दोन सुवर्णांसह एकूण चार पदके जिंकली.
Tokyo Paralympics 2020: टोकियोमध्ये खेळल्या जाणाऱ्या पॅरालिम्पिक खेळांमध्ये भारतासाठी आजचा दिवस चांगला राहिला. सकाळी पहिला नेमबाज मनीष नरवालने भारतासाठी सुवर्ण जिंकले. यानंतर संध्याकाळी प्रमोद भगतने बॅडमिंटन स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. अशा प्रकारे भारताला आतापर्यंत चार सुवर्णपदके मिळाली आहेत. याशिवाय 50 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सिंहराज आणि बॅडमिंटनमध्ये मनोज सरकार यांनी कांस्यपदक जिंकले. अशा प्रकारे भारताने आज दोन सुवर्णांसह एकूण चार पदके जिंकली.
मनीष नरवालने केली सुरुवात
नेमबाज मनीष नरवालने आज टोकियो पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी पहिले पदक जिंकले. हरियाणातील कठुरा गावातील रहिवासी मनीष नरवाल यांनी वयाच्या 19 व्या वर्षी इतिहास रचला. त्याने 50 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकले. सिंगराज याच स्पर्धेच्या अंतिम फेरीत कांस्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरला.
Tokyo Paralympics 2020: आणखी एक गोल्ड! प्रमोद भगतला बॅडमिंटनमध्ये सुवर्ण तर मनोज सरकारला कांस्य
बॅडमिंटनमध्ये सुवर्ण जिंकणारा प्रमोद भगत पहिला भारतीय
बॅडमिंटन यावर्षी पॅरालिम्पिक स्पर्धेत डेब्यू करत आहे. जगातील नंबर वन खेळाडू भगत या खेळात सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला. त्याने अंतिम फेरीत डॅनियन बेथेलचा 21-14 आणि 21-17 असा सरळ गेममध्ये पराभव केला. त्याचबरोबर भारताच्या मनोज सरकारनेही बॅडमिंटन स्पर्धेत चमत्कार केला. त्याने कांस्यपदक जिंकले. मनोजने जबरदस्त कामगिरी करत जपानच्या डेसुके फुजीहाराला सरळ गेममध्ये 22-20 आणि 21-13 असे पराभूत केले.
भारताची सर्वोत्तम कामगिरी
टोकियो पॅरालिम्पिक 2020 मध्ये भारताकडे आता एकूण 17 पदके आहेत. पॅरालिम्पिक खेळांच्या इतिहासातील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. रविवारी ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारताने आतापर्यंत चार सुवर्ण, सात रौप्य आणि सहा कांस्यपदके जिंकली आहेत. त्याचबरोबर भारत गुणतालिकेत 26 व्या स्थानावर आहे.