Praveen Kumar wins Silver : पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीत प्रवीण कुमारची 'रौप्य'भरारी; भारताच्या खात्यात आतापर्यंत 11 पदकं
Tokyo 2020 Paralympics Games : टोकियोमध्ये देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात आला आहे. पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीत प्रवीण कुमारनं रौप्य पदकाची कमाई केली आहे.
Tokyo 2020 Paralympics Games : टोकियोमध्ये सध्या सुरु असलेल्या 2020 पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर पडली आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच पदकाचा प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या प्रवीण कुमारनं हाय जंप (उंच उडी) T64 प्रकाराच्या अंतिम सामन्यात रौप्य पदकाची कमाई केली आहे.
प्रवीण कुमारच्या या रौप्य पदकासह टोकियोमधील भारताच्या खात्यातील पदकांची संख्या 11 झाली आहे. आतापर्यंत पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात यंदा भारताच्या खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी केली आहे.
टोकियो पॅरालिम्पिक खेळांच्या सुरुवातीपासून प्रवीण कुमारला हाय जंप प्रकारात पदकाचा प्रवळ दावेदार समजलं जात होतं. प्रवीण कुमारनं सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करत रौप्य पदकावर नाव कोरलं. एवढंच नाहीतर त्यानं उत्तम गुणांची कमाई करत आपला एशियन रेकॉर्डही कायम ठेवला आहे.
प्रवीण कुमारचा रेकॉर्ड
प्रवीण कुमारनं आपल्या तीन प्रयत्नांमध्ये सातत्यानं सुधारणा केली. प्रवीण कुमारनं आपल्या पहिल्या प्रयत्नात 1.83 मीटर उंच उडी घेतली. त्यानंतर त्यानं आपल्या दुसऱ्या प्रयत्नात 1.93 मीटर उंच उडी घेतली. तर तिसऱ्या प्रयत्नात प्रवीण कुमारनं स्वतःचाच रेकॉर्ड मोडीत काढत 2.07 मीटर उंच उडी घेतली.
प्रवीण कुमार आपल्या तिसऱ्या प्रयत्नात सुवर्ण पदकाच्या अत्यंत जवळ पोहोचला होता. प्रवीण कुमारनं T64 इव्हेंटमध्ये 2.07 मीटरची उंच उडी घेतली आणि आपला एशियन रेकॉर्डही कायम ठेवला.
भालाफेकपटू सुमित अंतिलची सुवर्ण पदकाला गवसणी
भारतीय भालाफेकपटू सुमित अंतिलने सोमवारी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. पहिल्यांदा पॅरालिम्पिकमध्ये खेळताना सुमितने भाला फेकण्याच्या F-64 स्पर्धेच्या दुसऱ्या प्रयत्नात 68.08 मीटरचा थ्रो केला. त्यानंतर त्याने आपल्या पाचव्या प्रयत्नात त्यात आणखी सुधारणा केली आणि 68.55 मीटर भाला फेकून विश्वविक्रम केला.
सुमितने पहिल्याच प्रयत्नात 66.95 मीटर अंतरावरून भाला फेकला, जो देखील एक विक्रम आहे. त्याने दुसऱ्या प्रयत्नात 68.08 मीटर भाला फेकला. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्याने 65.27 मीटर, चौथ्या प्रयत्नात 66.71 मीटर आणि पाचव्या प्रयत्नात सुमितने 68.55 मीटर भाला फेकला.
पॅरालिम्पिकमध्ये अवनी लेखराची 'सुवर्ण' भरारी
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताची नेमबाज अवनी लेखरा हिची सुवर्ण कामगिरी पाहायला मिळत आहे. 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत अवनी लेखराला सुवर्ण पदक मिळालं आहे. दरम्यान, अवनी लेखरानं क्वॉलिफिकेश राउंडमध्ये सातवं स्थान पटकावलं होतं. अवनीनं यासोबतच आणखी एक इतिहास रचला आहे. पॅरालिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी अवनी ही पहिली खेळाडू ठरली आहे. अवनी या इव्हेंटच्या क्वॉलिफिकेशन राउंडमध्ये सातव्या स्थानी होती. अंतिम सामन्यात तिनं धमाकेदार खेळी करत सुवर्णपदकावर नाव कोरलं. त्यासोबतच टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचं तिसरं पदक निश्चित झालं आहे.