Vinesh Phogat : जपानची अपराजित पैलवान यूई सुसाकीला धूळ चारली, विनेश फोगटकडून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मोठा उलटफेर
Vinesh Phogat : विनेश फोगट हिनं पॅरिस ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी तिनं जपानच्या युई सुसाकीला पराभूत केलं.
![Vinesh Phogat : जपानची अपराजित पैलवान यूई सुसाकीला धूळ चारली, विनेश फोगटकडून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मोठा उलटफेर Paris Olympics 2024 Vinesh Phogat beats the legendary wrestler of Japan yui susaki Vinesh Phogat : जपानची अपराजित पैलवान यूई सुसाकीला धूळ चारली, विनेश फोगटकडून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मोठा उलटफेर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/06/1ae573a0b61434e070a6072738a6c61d1722946477775989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पॅरिस : भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकचा (Paris Olympics) अकरावा दिवस महत्त्वपूर्ण ठरला. अकराव्या दिवशी नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) भालाफेकच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. दुसरीकडे भारताची पैलवान विनेश फोगट (Vinesh Phogat) हिनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. विनेश फोगट भारताकडून 50 किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात खेळते. आज विनेश फोगटनं दोन सामन्यात विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी विनेश फोगटमध्ये समोर जपानच्या यूई सुसाकीचं आव्हान होतं. आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये एकाही सामन्यात पराभूत न झालेल्या युई सुसाकीला विनेश फोगटनं पराभूत केलं.
अपराजित यूई सुसाकीचा पहिला पराभव
विनेश फोगटनं जपानच्या दोनवेळा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या आणि वर्ल्ड चॅम्पियन युई सुसाकी चा 3-2 असा पराभव केला. विनेश फोगटनं युई सुसाकीला पराभूत करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मोठा उलटफेर केला आहे.
विनेश फोगट आणि युई सुसाकी हिचा सामना जेव्हा सुरु झाला तेव्हा अनेकांना युई सुसाकी ही विजयाची प्रमुख दावेदार वाटत होती. युई सुसाकीनं तिच्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये एकही पराभव स्वीकारला नव्हता. राष्ट्रीय करिअरमध्ये तिला तीन वेळा पराभव स्वीकारावा लागला होता. जपानच्या इरी युकी हिनं तिचा पराभव केला होता. मात्र, युई सुसाकीचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आतापर्यंत एकही पराभव झाला नव्हता विनेश फोगटनं यूकी सुसाकीला 3-2 असं पराभूत करत इतिहास रचला.
युई सुसाकीला पराभूत करणं आंतरराष्ट्रीय पातळीवर आतापर्यंत कुणालाही जमलेलं नव्हतं. भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हिनं ती कामगिरी करुन दाखवली. सुसाकीनं सामन्यात सुरुवातीला आघाडी घेतली होती. सुसाकीनं सुरुवातीला विनेश फोगटवर 2-0 अशी आघाडी घेतली होती. यानंतर विनेश फोगटनं सुसाकीला बॅकफुटवर ढकलत 2 गुण मिळवत 2-2 अशी बरोबरी केली. यानंतर सुसाकीनं एका निर्णयाला आक्षेप घेतला. त्यावेळी तो तिच्या विरोधात गेला आणि विनेश फोगटनं 3-2 अशा फरकानं विजय मिळवला.
विनेश फोगट उपांत्य फेरीत
विनेश फोगटनं 50 किलो फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात उपांत्य फेरीत धडक दिली आहे. उपांत्यपूर्व फेरीत विनेश फोगटची लढत यूक्रेनच्या ओकसाना लिवाच हिच्याशी होती. विनेश फोगटनं अखेरच्या मिनिटात आक्रमक खेळ करत 7-5 अशा फरकानं विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत विनेश फोगटची लढत क्यूबाची पैलवान वाय. गुझमन हिच्यासोबत होणार आहे. गुझमन हिनं उपांत्यपूर्व फेरीत तिची प्रतिस्पर्धी असलेल्या खेळाडूचा 10-0 असा पराभव केला आहे.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)