Donkey Route : 'अमेरिकेत गेल्यावर आयुष्य बदलेल' कॅनडातून सर्वाधिक भारतीयांचीच अमेरिकेत डंकी मार्गाने घुसखोरी कशी केली जाते? किती हजार डाॅलर्सची मागणी केली जाते??
चित्रपटांव्यतिरिक्त 'डंकी रूट'चा गौरव रिल्सच्या माध्यमातून केला जात आहे. त्यामुळे अनेकांना हा धोकादायक मार्ग स्वीकारण्याची प्रेरणा मिळत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

Donkey Route to migrate illegally to the US : शाहरुख खानच्या 'डिंकी' चित्रपटाची कथा अशी होती की काही लोक भारत सोडून परदेशात जाण्याचे स्वप्ने पाहत असतात. कायदेशीर मार्गाने काम होत नाही तेव्हा ते 'डंकी रुट' (अवैध मार्गांचा वापर) अवलंबतात. यानंतर त्यांच्या आयुष्यातील अडचणींभोवती संपूर्ण कथा विस्तारली गेली होती. परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक आपला जीव धोक्यात घालण्यास मागेपुढे पाहत नाहीत हे या चित्रपटातून दिसून आले. डंकी मार्गांचा वापर सर्वाधिक गुजरात, पंजाब आणि हरियाणा या तीन राज्यामधील नोकरीच्या शोधातील तरुणाकंडून केला जात आहे. घुसखोरीच्या प्रयत्नात जवळपास 90 हजार भारतीयांना अमेरिकेत अटक करण्यात आली असून यामधील निम्मे गुजरातमधील आहेत. अमेरिकेतून हद्दपार करण्यात आलेल्या दुसऱ्या विमानातील सर्वाधिक 18 ते 30 वयोगटातील तरुण आहेत. घरदार विकून, जमीन विकून यांनी डंकी मार्गाचा अवलंब केला आहे.
डंकी रुटमधून छान छान स्वप्ने दाखवण्याचा धंदा
चित्रपटांव्यतिरिक्त 'डंकी रूट'चा गौरव रिल्सच्या माध्यमातून केला जात आहे. त्यामुळे अनेकांना हा धोकादायक मार्ग स्वीकारण्याची प्रेरणा मिळत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, आता टिकटॉकवर संबंधित एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे, जिथे कॅनडाचे 'कोयोट्स' (मानवी तस्कर) उघडपणे अमेरिकेत घुसखोरी करण्याची ऑफर देत आहेत. त्यांचा दावा आहे की ते फक्त 5000 डॉलर्समध्ये कोणत्याही त्रासाशिवाय ते अमेरिकेत पोहोचवत आहेत.
कसा सुरु आहे गोरखधंदा?
हे मानवी तस्कर विशेषतः भारतीय नागरिकांना लक्ष्य करतात. कॅनडामधून अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी त्यांना गुप्त मार्ग आणि नकाशे देखील दिले जात आहेत. न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टनला जाण्यासाठी, मॉन्ट्रियल, ब्रॅम्प्टन (टोरंटोजवळ) आणि सरे (व्हँकुव्हरजवळ) येथून प्रवास सुरू होतो.
'पोहोचल्यानंतर पैसे द्या'
न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालानुसार, टिकटोकवर डंकी रुट 100 टक्के सुरक्षित असल्याचा दावा करणाऱ्या पोस्ट केल्या जातात. अमेरिकेत गेल्यावर तुमचे आयुष्य बदलेल. तुम्ही अशा ठिकाणी असाल जे स्वर्गापेक्षा कमी नाही. याशिवाय अमेरिकेच्या भूमीवर पाय ठेवल्यानंतरच पैसे द्यावेत, असेही त्यांचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर तस्करांच्या खात्यांवर अशा लोकांचे रिव्ह्यूही पाहायला मिळतात. पंजाबी भाषेत पोस्ट केलेल्या या व्हिडिओंमध्ये लोक सांगत आहेत की त्यांनी सीमा कशी सहज पार केली.
'सीमा फक्त नावालाच'
कॅनडा-यूएस सीमा ही जगातील सर्वात लांब सीमा (8891 किमी) आहे, परंतु ती मेक्सिकोच्या सीमेइतकी सुरक्षित नाही. येथे अनेक क्षेत्रे आहेत जिथे पहारेकरी नाहीत, फक्त जंगले आणि टेकड्यांमधील मोकळे रस्ते आहेत. त्यामुळे तस्कर या सीमेला 'ओपन एन्ट्री पॉइंट' मानतात. ब्रिटिश कोलंबियाच्या क्वांटलेन पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटीमध्ये राज्यशास्त्राचे प्राध्यापक असलेले शिंदर पुरवाल म्हणतात की, ही सीमा फक्त नावापुरती आहे, जेव्हा कोणी पाहिजे तेव्हा ओलांडू शकतो.
भारतीयांची सर्वाधिक घुसखोरी!
2024 मध्ये आतापर्यंत अमेरिकेच्या उत्तर सीमेवरून दररोज सरासरी 100 भारतीय नागरिक पकडले गेले आहेत. गेल्या दोन वर्षांत ही संख्या तीन पटीने वाढली आहे. बहुतेक भारतीय विद्यार्थी व्हिसावर कॅनडामध्ये येतात, पण नंतर अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न करतात.
कॅनडावर ट्रम्प नाराज
या तस्करीवर नाराजी व्यक्त करत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 25 टक्के शुल्क आकारण्याची धमकी दिली होती. सध्या, जस्टिन ट्रूडो सरकारने 10,000 सीमा रक्षक आणि ड्रोन पाळत ठेवण्याचे आश्वासन देऊन हा निर्णय 30 दिवसांसाठी स्थगित ठेवला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
