(Source: Poll of Polls)
Vinesh Phogat: विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र; भारताला मोठा धक्का, एका रात्रीत काय घडलं?
Vinesh Phogat Paris Olympics 2024: विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली आहे. विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती.
Vinesh Phogat Paris Olympics 2024: भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिने 50 किलो फ्रीस्टाइल गटात शानदार कामगिरी करताना अंतिम फेरी गाठली. विनेश फोगाटने क्युबाच्या युसनेलिस गुझमन लोपेझविरुद्ध 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला. विनेश फोगाट ऑलिम्पिक कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू, तर सुशील कुमारनंतरची पहिली भारतीय ठरली. मात्र अंतिम सामन्याआधी एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली आहे. विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र तिचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे विनेश फोगाटला अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. परंतु तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आल्याचं सांगण्यात येत आहे. विनेश फोगाट रौप्य आणि कांस्य पदकासाठीही पात्र होणार नाही.
Indian Wrestler Vinesh Phogat disqualified from the Women’s Wrestling 50kg for being overweight.
— ANI (@ANI) August 7, 2024
It is with regret that the Indian contingent shares news of the disqualification of Vinesh Phogat from the Women’s Wrestling 50kg class. Despite the best efforts by the team through… pic.twitter.com/xYrhzA1A2U
नेमकं काय घडलं?
विनेश फोगाटचे वजन जास्त असल्याचे लक्षात आल्यानंतर मंगळवारी रात्रभर भारतीय पथकाकडून रात्रभर हालचाली सुरु होत्या. मात्र, बुधवारी सकाळी झालेल्या तपासणीवेळी विनेश फोगाटचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले. यानंतर विनेश फोगाटकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. आता ऑलिम्पिकसाठी गेलेल्या भारतीय पथकाकडून उर्वरित सामन्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे.
पंतप्रधान मोदींनी फोन फिरवला-
विनेश फोगाटला अपात्र ठरवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी चर्चा केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी पीटी उषा यांच्याकडून या विषयावर आणि विनेशला अपात्र ठरवल्यानंतर आता भारताकडे कोणते पर्याय आहेत याबद्दल प्राथमिक माहिती घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान मोदींनी पी. टी. उषा यांना विनेश फोगटच्या प्रकरणात तिला मदत करण्यासाठी सर्व पर्यायांचा शोध घेण्यास सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विनेशला मदत होणार असेल तर तिच्या अपात्रतेबद्दल तीव्र निषेध नोंदवावा, अपील दाखल करावे अशीही सूचना पीएम मोदी यांनी पीटी उषा यांना केली आहे.
विनेश फोगाटची प्रकृती बिघडली-
विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली आहे. यानंतर विनेश फोगाटची प्रकृती बिघडली आहे. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. डीहायड्रेशनचा त्रास होत अल्यामुळं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
केस कापले, रक्तही काढलं-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विनेश फोगटनं सेमीफायनल जिंकल्यानंतर आराम केला नाही. तिनं रात्रभर जागून तिचं अतिरिक्त वजन कमी करण्याचा खूप प्रयत्न केला. स्पोर्ट्स स्टारच्या रिपोर्टनुसार, विनेश फोगटनं वजन कमी करण्यासाठी सायकलिंग केली, तिनं स्किपिंग केली. एवढंच नाही तर या खेळाडूनं आपले केस आणि नखंही कापली. धक्कादायक बाब म्हणजे, एवढं असूनही विनेशला निर्धारित मर्यादा गाठता आली नाही.
शरीरातील लिक्विड कमी झालं अन्...
विनेश फोगाटला काल एका दिवसात तीन लढती खेळाव्या लागल्या. या तीन लढती खेळल्यामुळे तिच्या शरीरातील लिक्विड कमी झाले. म्हणूनच ऑलिम्पिक कमिटीच्या वैद्यकीय पथकाच्या सल्ल्यानुसार डीहायड्रेट होऊ नये यासाठी तिला लिक्विड देण्यात आले. त्यामुळेच जेव्हा विनेश फोगाटचे वजन केले गेले तेव्हा पोटातील ते लिक्विडमुळे तिचे वजन वाढले, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.