Gautam Gambhir : भारतानं श्रीलंकेविरुद्ध मलिका गमावल्यानंतर गौतम गंभीरची पहिली सोशल मीडिया पोस्ट, परफेक्ट टायमिंग साधत म्हणाला...
Gautam Gambhir : भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यानं श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे गमावल्यानंतर पहिली सोशल मीडिया पोस्ट केली आहे.
नवी दिल्ली : भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्यासाठी श्रीलंका दौरा संमिश्र ठरला आहे. भारतानं श्रीलंकेविरुद्धची टी 20 मालिका 3-0 नं जिंकली. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेनं भारताला 2-0 नं पराभूत केलं. गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांना भारतीय संघाच्या (Team India) आगामी काळातील रणनीतीवर विचार करावा लागणार आहे. भारत सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिका आणि टी 20 मालिका खेळणार आहे. भारताच्या वनडे मालिकेतील पराभवावर गौतम गंभीर याची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र, गंभीरनं मालिका गमावल्यानंतर एका खास कारणासाठी सोशल मीडिया पोस्ट केली आहे.
गौतम गंभीरच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये काय म्हटलंय?
भारतीय क्रिकेट टीमचा मुख्य प्रशिक्षक असलेल्या गौतम गंभीरनं हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्त्वात हॉकी संघानं कांस्य पदक मिळवल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. यामध्ये गौतम गंभीरनं भारताचा गोलकीपर पीआर श्रीजेश याचा देखील खास उल्लेख केला आहे. हॉकी ही भावना आहे, जय हिंद, आपला चॅम्पियन श्रीजेशला परफेक्ट फेअरवेल दिलेलं आहे, कांस्य पदकाचा विजय ही उत्कृष्ट कामगिरी असल्याचं गौतम गंभीरनं म्हटलं आहे.
गौतम गंभीरची पोस्ट
“Hockey is an emotion” जय हिन्द! 🇮🇳 Perfect farewell to our champion #Shreejesh! Brilliant Bronze 🥉 pic.twitter.com/ejDzVNEl6F
— Gautam Gambhir (@GautamGambhir) August 8, 2024
भारतीय हॉकी संघाला ऑलिम्पिकमध्ये 13 वं पदक
भारतीय हॉकी संघानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्पेनला 2-1 नं पराभूत करत कांस्य पदक पटकावलं. पॅरिस ऑलम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची सुवर्णपदकाची संधी हुकली असली तरी हरमनप्रीत सिंगचं आक्रमण आणि पीआर श्रीजेशचा बचाव या जोरावर कांस्य पदक जिंकलं. भारतानं ऑलिम्पिकमध्ये चौथं कांस्य पदक जिंकलं आहे. भारतीय हॉकी संघानं ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत 13 पदकं जिंकली आहेत. यामध्ये 8 सुवर्णपदकं, एक रौप्य पदक आणि चार कांस्य पदकांचा समावेश आहे.
भारतानं कांस्य पदकाच्या सामन्यात स्पेनला 2-1 असं पराभूत केलं. या मॅचमध्ये भारताकडून हरमनप्रीत सिंगनं दोन गोल केले, तर, स्पेननं एक गोल केला.
दरम्यान, भारतीय क्रिकेट टीम साठी पुढील काही महिने महत्त्वाचे असणार आहेत. बांगलादेश, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय संघ खेळणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत झालेल्या पराभवानंतर बांगलादेश विरुद्धची कसोटी आणि टी 20 मालिका जिकंणं हे गौतम गंभीरपुढील महत्त्वाचं आव्हान असेल.
संबंधित बातम्या :