IND vs SL : श्रीलंकेच्या भारतावरील मालिका विजयाचं पाकिस्तान कनेक्शन समोर, जयसूर्यासोबत माजी खेळाडूनं बजावली महत्त्वाची भूमिका
IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेत श्रीलंकेनं 2-0 असा विजय मिळवला आहे.
कोलंबो : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेत श्रीलंकेनं (Sri Lanka Beat Team India) भारताला 2-0 असं पराभूत केलं. श्रीलंकेनं भारताला तब्बल 27 वर्षानंतर एकदिवसीय मालिकेत पराभूत केलं. श्रीलंकेच्या या विजयात अंतरिम प्रशिक्षक सनथ जयसूर्या याची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. सनथ जयसूर्याच्या मार्गदर्शनात श्रीलंकेनं भारताला पराभूत करण्याची किमया साधली. श्रीलंकेच्या भारतावरील मालिका विजयामध्ये सनथ जयसूर्याला पाकिस्तानच्या खेळाडूची मदत झाल्याचं समोर आलं आहे.
श्रीलंका क्रिकेट संघाचा अंतरिम प्रशिक्षक म्हणून सनथ जयसूर्या कार्यरत आहे. सनथ जयसूर्या 1997 मध्ये भारताला पराभूत करणाऱ्या श्रीलंकेच्या संघातील महत्त्वाचा खेळाडू होता, 1997 मध्ये श्रीलंकेनं भारताला 3-0 नं पराभूत केलं होतं. त्या मालिकेतील प्लेअर ऑफ द सीरिज पुरस्कार सनथ जयसूर्याला देण्यात आला होता.
श्रीलंकेनं भारताला 2-0 नं पराभूत केलं. या मालिकेतील पहिली मॅच टाय ठरली होती. श्रीलंकेनं तिन्ही मॅचमध्ये भारतीय संघाच्या 10 विकेट घेतल्या. श्रीलंकेच्या या विजयामध्ये पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आकिब जावेद याचं देखील योगदान असल्याचं समोर आलं आहे.
भारतानं यापूर्वी झालेल्या आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत आणि भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेला पराभूत केलं होतं. त्यामुळं भारतीय संघाला एकदिवसीय मालिकेत विजयाचे प्रमुख दावेदार मानलं जात होतं. मात्र, भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली मॅच टाय झाली होती. दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेनं भारताला 32 धावांनी पराभूत केलं. तर, तिसऱ्या वनडेत भारताचा 110 धावांनी पराभव करत श्रीलंकेनं मालिकेत विजय मिळवला.
भारताचे दिग्गज फेल
भारताचे फलंदाज या मालिकेत संघर्ष करताना पाहायला मिळाले. रोहित शर्मानं पहिल्या दोन्ही मॅचमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. रोहित शर्मानं तिसऱ्या वनडेमध्ये 35 धावा केल्या होत्या. रोहित शर्मा सोडून भारताचे इतर फलंदाज यश मिळवण्यात अपयशी ठरल्याचं पाहायला मिळालं. विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, शुभमन गिल हे श्रीलंकेच्या गोलंदाजांपुढं दमदार कामगिरी करु शकले नाहीत.
श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांनी तीन सामन्यांच्या मालिकेत 27 विकेट घेतल्या. श्रीलंकेचा बॉलिंग कोच आकिब जावेद याची भूमिका देखील महत्त्वाची ठरली. आकिब जावेदच्या मार्गदर्शनात श्रीलंकेनं दमदार कामगिरी करत भारताला पराभूत केलं.
आकिब जावेदनं पाकिस्तानसाठी 22 कसोटी सामने खेळले आहेत. तर,163 एकदिवसीय सामन्यांमध्ये तो खेळला आहे. जावेदनं कसोटीत 54 आणि एकदिवसीय सामन्यात 182 विकेट घेतल्या आहेत.
संबंधित बातम्या :
गौतम गंभीरचे 'हे' तीन निर्णय ठरतायत भारताची डोकेदुखी? इंडियन टीम धडा घेणार का?