(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tokyo Olypmic 2020 : कुस्तीमध्ये बजरंग पुनियाने जिंकलं कांस्य पदक, कझाकिस्तानच्या पैलवानावर 8-0 ने मात
टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू बजरंग पुनियाने कझाकस्तानचा पैलवान डाऊलेट नियाजबेकोव वर 8-0 ने मात केली.
Tokyo Olympic 2020 : टोकियो आलिम्पिकमध्ये भारताला सहावं पदक आज मिळालं आहे. कुस्तीपटू बजरंग पुनियाने 65 किलो फ्री स्टाईल कुस्तीमध्ये भारतासाठी कांस्य पदक पटकावलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू बजरंग पुनियाने कझाकिस्तानचा पैलवान दौलत नियाजबेकोव वर 8-0 ने मात केली. बजरंग पुनियाने वर्ल्ड चॅम्पियनशिप, आशियाई चॅम्पियनशिप आणि आशियाई खेळांनंतर आता ऑलिम्पिक पदक जिंकलं आहे.
बजरंग पुनियाने किर्गिस्तानच्या अर्नाझार अकमातालिएव्हला पराभूत केलं होतं. यानंतर उपांत्यपूर्व फेरीत इराणच्या मुर्तझा चेका घियासीला पराभूत करुन त्याने उपांत्य फेरी गाठली होती. मात्र उपांत्य फेरीत त्याला अझरबैजानच्या हाजी अलीयेवकडून 5-12 असे पराभूत व्हावे लागले होते.
टोकियो आलिम्पिकमध्ये मीराबाई चानूने भारताचं पदकाचं खातं उघडलं होतं. मीराबाईने वेटलिफ्टिंगमध्ये भारताला रौप्य पदक जिंकून दिलं. त्यानंतर पीव्ही सिंधूने बॅडमिंटमध्ये कांस्य पदक जिंकलं. बॉक्सर लवलीना बोरगोहेन हिने देखील दमदार कामगिरी करत कांस्य पदकावर नाव पटकावलं. लवलीना बॉक्सिंमध्ये पदक जिंकणारी तिसरी भारतीय बॉक्सर बनली.
भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक शोरेड मरिन यांचा राजीनामा!
त्यानंतर रवी दहियाने भारताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये दुसरं रौप्य पदक जिंकून दिलं. पैलवान रवी दहियाने 57 किलो फ्री स्टाईल गटात रौप्य पदक जिंकलं. त्यानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत 41 वर्षांंनंतर भारताला ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकून दिलं. आणि आज बजरंग पुनियाने कुस्तीत भारताला कांस्य पदक जिंकून दिलं आहे.
बजरंग पुनियाची कुस्तीतील कामगिरी
आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप (2017) आणि राष्ट्रकुल खेळ (2018) मध्ये सुवर्णपदके जिंकण्यात बजरंग यशस्वी ठरला होता. 2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बजरंगने अविस्मरणीय कामगिरी केली आणि 65 किलो वजन गटात सूवर्ण पदक पटकावले. त्यावेळी बजरंगने आपले सुवर्णपदक माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले होते. ऑक्टोबर 2018 मध्ये झालेल्या जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदकासह, तो 65 किलो वजन गटात जगातील नंबर 1 कुस्तीपटू बनला होता.