शरद पवार सिंह, अजित दादा वाघ, आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नाही; राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार
भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी अजित पवार हे पुण्याचे सर्वात मोठे 'आका' असल्याची टीका अजित पवारांवर केली. या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

अकोला : महापालिका निवडणुकांच्या (Election) अनुषंगाने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच टीका टिपण्णी सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपवर आणि पुण्यातील भाजप नेत्यांवर सडकून टीका करत आहेत. तर, भाजपही त्यांच्यावर पलटवार करताना पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारचं (Ajit pawar) महाराष्ट्राचे आका आहेत. एक तर तुम्ही स्वतःचा भ्रष्टाचार लपवायला भाजपमध्ये आला आहात. आधी स्वतःच्या लेकाचे पराक्रम पाहा, मुळात ते स्वतः आका आहेत, हे त्यांनी जाहीर करावं अशा शब्दात पिंपरीतील भाजप आमदार महेश लांडगे यांनी अजित पवारांवर टीका केली होती. त्यावर, अजित पवारांनी मोजकीच प्रतिक्रिया दिली. आता, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी तीव्र शब्दात महेश लांडगेंवर पलटवार केला आहे.
भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी अजित पवार हे पुण्याचे सर्वात मोठे 'आका' असल्याची टीका अजित पवारांवर केली. या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसचा वारसा हा शरद पवार आणि अजित पवार या सिंह आणि वाघाचा आहे. त्यामुळे आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नसल्याचा खोचक टोला मिटकरी यांनी लगावला. महेश लांडगे यांना कदाचित पुण्याचे आणि महाराष्ट्राचे पुढचे काका कोण? हे म्हणायचं असेल. मात्र, त्यांनी चुकीने 'आका' म्हटलं असावं, असा चिमटाही आमदार मिटकरी यांनी काढला. यावेळी, "भुंकणाऱ्या कुत्र्यांना भुंकू द्या, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका'' असा अर्थ असलेल्या संत तुकारामांच्या एका अभंगाचा दाखला देखील त्यांनी दिला.
महेश लांडगेंच्या टीकेवर बोलताना अजित पवारांनी एका वाक्यात विषय संपवला. मी कोण आहे जनता ठरवेल, 15 तारखेपर्यंत कळ काढा उत्तर देतो, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. त्यानंतर अमोल मिटकरी यांनी कडक शब्दात टीका केलीय.
मुरलीधर मोहोळांचे अजित पवारांना आव्हान
दरम्यान, पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातही शाब्दिक चकमक सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील विकासकामांवर शंका उपस्थित केल्याबाबत मोहोळ यांनी टीका केली. निवडणुकीत मुद्दे शिल्लक न राहिल्यामुळे भाजपवर खोटे आरोप केले जात आहेत. अजित पवार विकासकामावर बोलताना काही आरोप करत असतील, जर दावे करत असतील तर त्यांनी त्याचे ठोस पुरावे द्यावेत, असे आव्हानही त्यांनी दिले.
हेही वाचा
मोठी बातमी! नव्याने निवडून आलेल्या 11 नगरसेवकांचा अख्खा गटच भाजपात, काँग्रेसला 'दे धक्का'





















