MI vs CSK : मराठमोळ्या दुबे-गायकवाडनं मुंबईला धुतलं, चेन्नईने चोपलं, CSK ची 206 धावांपर्यंत मजल
MI vs CSK, IPL 2024 : ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबेच्या शानदार अर्धशतकाच्या बळावर चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात 206 धावांपर्यंत मजल मारली.
MI vs CSK, IPL 2024 : ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबेच्या शानदार अर्धशतकाच्या बळावर चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात 206 धावांपर्यंत मजल मारली. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने 69 तर शिवम दुबे यानं 66 धावांची खेळी केली. एमएस धोनीने अखेरच्या चार चेंडूवर 20 धावांचा पाऊस पाडला. मुंबईकडून हार्दिक पांड्यानं दोन विकेट घेतल्या. मुंबईला विजयासाठी 207 धावांची गरज आहे.
अजिंक्य रहाणेचा फ्लॉप शो -
हार्दिक पांड्यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईनं प्रथम फलंदाजी करताना अजिंक्य रहाणे आणि रचिन रविंद्र यांना सलामीला पाठवलं. पण अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. अजिंक्य रहाणे याला दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही. अजिंक्य रहाणेनं 8 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने फक्त पाच धावाच काढल्या. रहाणे बाद झाल्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र यांनी डाव संभाळण्याचा प्रयत्न केला. पण रचिन रवींद्र श्रेयस गोपालच्या गोलंदाजीवर बाद झाला. रचिन रवींद्र यानं 16 चेंडूमध्ये दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 21 धावांची खेळी केली. रचिन रवींद्र आणि ऋतुराज गायकवाड यांनी 37 चेंडूमध्ये 52 धावांची भागिदारी केली.
ऋतुराजची कर्णधारपदाला शोभेशी खेळी -
अजिंक्य आणि रचिन बाद झाल्यानंतर ऋतुराज गायकवाडने शिवम दुबेच्या साथीने चेन्नईची धावसंख्या वाढवली. दोघांनी 45 चेंडूमध्ये 90 धावांची भागिदारी केली. ऋतुराज गायकवाड यानं वानखेडे स्टेडियमवर अर्धशतकी खेळी करत डावाला आकार दिला. गायकवाडनं 40 चेंडूमध्ये 173 च्या स्ट्राईक रेटने 69 धावांची वादळी केली. या खेळीमध्ये ऋतुराज गायकवाड यानं पाच षटकार आणि पाच चौकारांचा साज दिला. ऋतुराज गायकवाड यानं पहिल्या चेंडूपासूनच मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. गायकवाड यानं कर्णधारपदाला साजेशी खेळी केली.
शिवम दुबेची वादळी अर्धशतक -
कर्णधार ऋतुराज माघारी परतल्यानंतर शिवम दुबे यानं डावाची सुत्रे हातात घेतली. शिवम दुबे यांनं मुंभईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. शिवम दुबं यानं वादळी अर्धशतकी खेळी केली. दुबेला डॅरेल मिचेल यानं चांगली साथ दिली. त्यानं 14 चेंडूमध्ये एका चौकाराच्या मदतीने 17 धावांची खेळी केली. दुबे आणि मिचेल यांच्यामध्ये 24 चेंडूमध्ये 36 धावांची भागिदारी झाली. मिचेल बाद झाल्यानंतर धोनी फलंदाजीसाठी आला. धोनीने हार्दिक पांड्याला पहिल्याच चेंडूवर षटकार मारत आपले इरादे स्पष्ट केले. धोनीने हार्दिक पांड्याची गोलंदाजी धुतली. धोनीने हार्दिक पांड्याची गोलंदाजी फोडली. धोनीने चार चेंडूमध्ये तीन षटकारांच्या मदतीने 20 धावा वसूल केल्या. शिवम दुबे यानं नाबाद 66 धावांची खेळी केली. शिवम दुबे यानं 38 चेंडूमध्ये 10 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 66 धावांचं योगदान दिलं.
मुंबईची गोलंदाजी कशी राहिली ?
जसप्रीत बुमराहचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला धावा रोखण्यात यश आले नाही. जसप्रीत बुमराहला विकेट मिळाली नाही, पण त्यानं चार षटकात फक्त 27 धावा खर्च केल्या. मुंबईकडून गेराल्ड कोइत्जे, श्रेयस गोपाल आणि हार्दिक पांड्या यांना विकेट मिळाल्या. हार्दिक पांड्या सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्यानं दोन फलंदाजांना तंबूत धाडलं. कोइत्जे आणि श्रेयस गोपाल यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. रोमिरिओ शेफर्ड सर्वात महागडा गोलंदाज ठरला. शेफर्ड यानं दोन षटकात 33 धावा खर्च केल्या.
दोन्ही संघाची प्लेईंग 11 -
मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11 - रोहित शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, टीम डेविड, मोहम्मद नबी, रोमिरिओ शेफर्ड, श्रेयस गोपाळ, जसप्रीत बुमारह, गेराल्ड कोइत्जे
राखीव खेळाडू - सूर्यकुमार यादव, डेवॉल्ड ब्रेविस, नमन धीर, वढेरा, हार्विक
चेन्नईची प्लेईंग 11 - ऋतुराज गायकवाड, रचिन गायकवाड, डॅरेल मिचेल, शिवम दुबे, अजिंक्य रहाणे, समीर रिझवी, एमएस धोनी, रविंद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान
राखीव खेळाडू - पथिराणा, मिचेल सँटनर, मोईन अली