राजस्थानचा 4 विकेटने रॉयल विजय, आरसीबीचं स्पर्धेतील आव्हान संपलं, चेन्नईमध्ये SRH vs RR चा सामना
RR vs RCB IPL 2024 Eliminator : संजू सॅमसनच्या राजस्थानने आरसीबीचा पराभव करत क्वालिफायरचं तिकिट मिळवले आहे.
RR vs RCB IPL 2024 Eliminator : संजू सॅमसनच्या राजस्थानने आरसीबीचा पराभव करत क्वालिफायरचं तिकिट मिळवले आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर एलिमेनटरच्या सामन्यात राजस्थानने आरसीबीचा चार विकेटने पराभव केला. आरसीबीने दिलेले 173 धावांचे आव्हान राजस्थानने 19 षटकात सहा विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले.
राजस्थानला मिळालं चेन्नईचं तिकिट -
आरसीबीचा अहमदाबादमध्ये पराभव करत राजस्थानने चेन्नईचं तिकिट मिळवले आहे. राजस्थान आता क्विलिफायर 2 मध्ये हैदराबादविरोधात भिडमार आहे. हैदराबादला कोलकात्याकडून क्वालिफायर एक मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. 24 मे रोजी चेन्नईमध्ये हैदराबाद आणि राजस्थान यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे. यामधील विजेता संघ 26 मे रोजी कोलकात्याशी भिडणार आहे.
आरसीबीचं आव्हान संपले -
आयपीएल 2024 मध्ये आरसीबीने शानदार कमबॅक करत प्लेऑफमध्ये स्थान पटकावले होते. आरसीबीने लागोपाठ सहा सामन्यात विजय मिळवत प्लेऑफचं तिकिट मिळवलं होतं. पण आरसीबीला एलिमेनटरचा अडथळा दूर करता आला नाही. आरसीबीने आतापर्यंत नऊ वेळा प्लेऑफमध्ये प्रेवश केलाय, पण त्यांना चषकावर नाव कोरता आले नाही. 17 वर्षानंतरही आरसीबीला चषक उंचवता आलेला नाही. तीन वेळा त्यांनी फायनलमध्येही धडक मारली, पण चषकापासून दूरच राहिले.
यशस्वी जायस्वालची शानदार खेळी -
173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यशस्वी जायस्वाल यानं आक्रमक सरुवात केली. त्याने आरसीबीच्या प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला. यशस्वी जायस्वाल याने 30 चेंडूत 45 धावांचा पाऊस पाडला. या खेळीमध्ये त्याने आठ चौकार लगावले.
रियान परागची जिगरबाज खेळी -
आघाडीचे फलंदाज माघारी गेल्यामुळे राजस्थानचा डाव फसणार का? असा सवाल उपस्थित होत होता. पण रियान परागने जिगरबाज खेळी करत राजस्थानच्या डावाला आकार दिला. रियान पराग याने 26 चेंडूमध्ये 36 धावांचा पाऊस पाडला. या खेळीमध्ये रियान पराग याने दोन षटार आणि दोन चौकार ठोकले.
हेटमायरचं कमबॅक -
दुखापतीनंतर शिमरोन हेटमायर यानं शानदार कमबॅक केले. हेटमायर याने आरसीबीच्या गोलंदाजांवर प्रतिहल्ला करत दबाव कमी केली. हेटमायर याने 14 चेंडूमध्ये 26 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने तीन चौकार आणि एक षटकार ठोकला.
पॉवेलने सामना संपवला -
सहा फलंदाज तंबूत परतल्यानंतर रोवमन पॉवेल याने फिनिशिंग टच दिला. पॉवेल याने आठ चेंडूमध्ये 16 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये पॉवेल याने एक षटकार आणि दोन चौकार ठोकले.
संजू फ्लॉप -
आरसीबीने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसन याला मोठी खेळी करता आली नाही. संजू सॅमसन याने आपली विकेट फेकली. संजू सॅमसन याला 13 चेंडूमध्ये फक्त 17 धावाच करता आल्या. या खेळीमध्ये त्याला एक षटकार ठोकता आल्या. टॉम केडमोर यानेही निराशा केली. केडमोर याने 15 चेंडूत 20 धावा केल्या. या खेळीत त्याने चार चौकार ठोकले. ध्रुव जुरेल यालाही मोठी खेळी करता आली नाही. ध्रुव जुरेल याने आठ धावांचे योगदान दिले.
आरसीबीची गोलंदाजी -
आरसीबीकडून मोहम्मद सिराज सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. सिराजने दोन फलंदाजांना तंबूत पाठवले. लॉकी फर्गुसन, कर्ण शर्मा आणि कॅमरुन ग्रीन यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.