कृणाल पांड्या, निकोलस पूरन यांनी धुतले, लखनौचं पंजाबपुढे 200 धावांचे आव्हान
Lucknow Super Giants vs Punjab Kings LIVE: निकोलस पूरन-कृणाल पांड्या यांच्या झंझावती फलंदाजीच्या जोरावर लखनौने 20 षटकांमध्ये 8 विकेटच्या मोबदल्यात 199 धावांपर्यंत मजल मारली. पंजाबकडून सॅम करन याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
LSG vs PBKS, IPL 2024 Live Score: क्विंटन डी कॉकचं अर्धशतक आणि निकोलस पूरन-कृणाल पांड्या यांच्या झंझावती फलंदाजीच्या जोरावर लखनौने 20 षटकांमध्ये 8 विकेटच्या मोबदल्यात 199 धावांपर्यंत मजल मारली. क्विंटन डी कॉक यानं 54 धावांची खेळी केली. कर्णधार पूरन याने 42 धावांचे योगदान दिले. तर कृणाल पांड्याने नाबाद 43 धावांचे योगदान दिले. पंजाबकडून सॅम करन याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. पंजाबला विजयासाटी 200 धावांचे विराट आव्हान आहे.
लखनौचा कर्णधार निकोलस पूरन यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुखापतग्रस्त असल्यामुळे केएल राहुल फक्त फलंदाजीसाठी मैदानात उतरला. केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी वेगवान सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. केएल राहुल 15 धावा काढून बाद झाला. राहुलने 9 चेंडूमध्ये एक चौकार आणि एक षटकार मारत 15 धावांचे योगदान दिले. क्विंटन डी कॉक याने एका बाजूने शानदार खेळी केली. पण दुसऱ्या बाजूला आघाडीच्या तिन्ही फलंदाजांनी निराश केले. केएल राहुल याच्यानंतर देवदत्त पडीक्कल यानेही विकेट फेकली. पडीक्कल याने सहा चेंडूमध्ये दोन चौकारांच्या मदतीने 9 धावांच केल्या. तर स्फोटक मार्कस स्टॉयनिस याला फक्त 19 धावा करता आल्या. स्टॉयनिस याने दोन षटकारांच्या मदतीने 19 धावांचं योगदान दिले.
क्विंटन डिकॉकचं शानदार अर्धशतक -
एका बाजूला विकेट पडत असताना क्विंटन डी कॉक यानं शानदार अर्धशतक ठोकले. क्विंटन डी कॉक याने संयमी फलंदाजी करत धावसंख्या हालती ठेवली. डी कॉकने 38 चेंडूमध्ये 54 धावांचे योगदान दिले. क्विंटन याने दोन षटकार आणि पाच चौकार लगावले. क्विंटन डी कॉक याने निकोलस पूरन याच्यासोबत चौथ्या विकेटसाठी 47 धावांची भागिदारी केली. तर स्टॉयनिससोबत 33 आणि राहुलसोबत 35 धावांची भागिदारी केली.
निकोलस पूरन याची वादळी खेळी -
कर्णधार निकोलस पूरन यानं कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. निकोलस पूरन याने 19 चेंडूमध्ये 41 धावांचा पाऊस पाडला. त्याने आपल्या खेळीमध्ये दोन षटकार आणि चार चौकार लगावले. निकोलस पूरन याने झटपट धावा काढत लखनौची धावसंख्या वाढवली. निकोलस पूरन याने डी कॉक याच्यासोबत 47 धावा जोडल्या. तर आयुष बडोनी याच्यासोबत 21 धावांची भागिदारी केली.
कृणाल पांड्याचा फिनिशिंग टच -
आयुष बडोनी फक्त आठ धावा काढून तंबूत परतला. अखेरीस कृणाल पांड्याने तळाच्या फलंदाजांना हाताशी धरत लखनौची धावसंख्या वाढवली. कृणाल पांड्याच्या झंझावती खेळीच्या बळावर लखनौचा संघ 199 पर्यंत पोहचला. कृणाल पांड्याने 22 चेंडूमध्ये 43 धावांचे योगदान दिले. यामध्ये दोन षटकार आणि चार चौकारांचा समावेश आहे.
पंजाबची गोलंदाजी कशी ?
पंजाबकडून सॅम करन याने सर्वात भेदक मारा केला. सॅम करन याने 4 षटकामध्ये 28 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. अर्शदीप सिंह याने 3 षटकांमध्ये 30 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. कगिसो रबाडा आणि राहुल चाहर यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतल्या. हरप्रीत ब्रार आणि हर्षल पटेल यांना एकही विकेट मिळाली नाही.