चेन्नईच्या पराभवानंतर धोनीने आपली चूक मान्य केली, म्हणाला 'तो' निर्णय चुकलाच
MS Dhoni IPL 2022 : हार्दिक पांड्याच्या गुजरात संघाने रविवारी वानखेडे मैदानावर रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सचा सात विकेटने पराभव केला
MS Dhoni IPL 2022 : हार्दिक पांड्याच्या गुजरात संघाने रविवारी वानखेडे मैदानावर रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सचा सात विकेटने पराभव केला. धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई संघ यंदाच्या आयपीएलचा विजयी समारोप करेल अशी आशा होती. पण गुजरातने चेन्नईचा पराभव केला. चेन्नईने दिलेल्या 134 धावांच्या आव्हानाचा गुजरातने यशस्वी पाठलाग केला. गुजरातकडून पराभव झाल्यानंतर धोनीने प्रतिक्रिया दिली. तसेच नेमकी चूक कुठे झाली.. याबाबत स्पष्टीकरण दिलेय...
सामन्यानंतर बोलताना धोनी म्हणाला की, नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी घेण्याचा निर्णय चुकला. खेळपट्टी गोलंदाजीसाठी पोषक होती.. सामना जसा जसा पुढे गेला तसा तसा खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक झाली. प्रथम फलंदाजी करताना बॅटवर चेंडू येत नव्हते. त्यामुळे फलंदाजी करताना अडचण येत होती. ' साई किशोरने चांगली गोलंदाजी केली. तसेच वेगवान गोलंदाज मथिसा पथिराना याचेही धोनीने कौतुक केले. धोनी म्हणाला की, पथिरानाची गोलंदाजी अॅक्शन लसिथ मलिंगासारखी आहे. तसेच तो अचूक टप्यावर गोलंदाजी करतो. पथिरानाकडे स्लोअर चेंडू टाकू शकतो. त्याला मोठा फटका मारणे कठीण आहे..
गुजरातविरोधात झालेल्या सामन्यात अंबाती रायडूला संधी मिळाली नव्हती. चेन्नईने प्लेईंग 11 मध्ये तब्बल चार बदल केले होते. त्यावर बोलताना धोनी म्हणाला की, 'आम्ही बेंच स्ट्रेंथला तपासून पाहत आहे.'
चेन्नईची फलंदाजी फ्लॉप -
चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांनी गुजरातच्या गोलंदाजीपुढे गुडघे टेकले. ऋतुराज गायकवाड यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.मोईन अलीला चांगली सुरुवात मिळाली होती, पण मोठी खेळी करण्यात अपयश आले. मोईन अली 21 धावा काढून बाद झाला. एन जगदीशन याने संयमी फलंदाजी करत अखेरपर्यंत लढत दिली. जगदीशन 39 धावांवर नाबाद राहिला. ऋतुराज गायकवाडने 53 धावांची खेळी केली. चेन्नईने दिलेले 134 धावांचे आव्हान गुजरातने साहाच्या नाबाद अर्धशतकाच्या मदतीने सात गडी राखून पूर्ण केले.
चेन्नईच्या नावावर लाजीरवाणा विक्रम -
धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईची यंदा लाजीरवाणी कामगिरी झाली आहे. चेन्नईला 13 सामन्यात फक्त चार विजय मिळवता आलेत. चेन्नईला आज पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईचा हा नववा पराभव होता. आयपीएलच्या इतिहासात चेन्नईला एका हंगामात इतक्या पराभवाचा कधीच सामना करावा लागला नव्हता. 15 वर्षाच्या आयपीएल इतिहासात चेन्नईची ही सर्वात लाजीरवाणी कामगिरी होय... आयपीएलच्या 15 व्या हंगामात चेन्नईचा अखेरचा सामना 20 मे रोजी राजस्थानविरोधात होणार आहे. हा सामना जिंकून दहा पराभवाचा नकोसा विक्रम टाळण्याचा प्रयत्न चेन्नई करेल.