समीर रिझवी ते कुमार कुशाग्र, 'हे' अनकॅप्ड खेळाडू लिलावात चमकले, 2024 च्या हंगामात कोणाचं नशिब फळाला येणार?
CSK ने अनकॅप्ड समीर रिझवीला 8.40 कोटी रुपयांना विकत घेतले. समीर रिझवीची मूळ किंमत 20 लाख रुपये होती. त्याचवेळी गुजरात टायटन्सने शाहरुख खानला 7.40 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघाचा भाग बनवले.
मुंबई : आयपीएल (IPL Auction 2024) लिलावात अनेक अनकॅप्ड खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. त्याचबरोबर या लिलावात अनेक मोठ्या खेळाडूंसाठी संघांनी बोली लावली नाही. उत्तर प्रदेशचा युवा फलंदाज समीर रिझवीला मोठी रक्कम मिळाली. चेन्नई सुपर किंग्जने समीर रिझवीला 8.40 कोटी रुपयांना खरेदी केले. समीर रिझवीची मूळ किंमत 20 लाख रुपये होती. गुजरात टायटन्सने 7.40 कोटी रुपयांमध्ये शाहरुख खानला आपल्या संघाचा भाग बनवले. शाहरुख खानची मूळ किंमत 40 लाख रुपये होती.
लिलावात (IPL Auction 2024) अनेक विक्रम मोडीत निघाले. मिचेल स्टार्क (Mitchell Starc) आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याशिवाय ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्यावरही 20 कोटींपेक्षा जास्त बोली लागली. स्टिव्ह स्मिथ, शाकीब अल हसन यासारखे दिग्गज मात्र अनसोल्ड राहिले. आयपीएलच्या 10 संघांनी आज 72 खेळाडू खरेदी केले. यामध्ये 30 खेळाडू विदेशी आहेत. दहा संघांनी 72 खेळाडूंवर 230 कोटी रुपये खर्च केले. कोलकाता संघाने आजचा आणि आयपीएलच्या इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू खरेदी केला.
'या' नवख्या खेळाडूंना संधी
दिल्ली कॅपिटल्सने कुमार कुशाग्रला 7.20 कोटी रुपयांना विकत घेतले. या युवा खेळाडूची मूळ किंमत 20 लाख रुपये होती, परंतु दिल्ली कॅपिटल्सने त्याला आपल्या संघात समाविष्ट करण्यासाठी मोठी रक्कम खर्च केली. राजस्थान रॉयल्सने शुभम दुबेला 5.80 कोटी रुपयांना खरेदी केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भाकडून खेळणाऱ्या शुभम दुबेची मूळ किंमत केवळ 20 लाख रुपये होती. त्याचवेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यश दयालला 5 कोटींना खरेदी केले. यापूर्वी यश दयाल गुजरात टायटन्सचा भाग होता.
समीर रिझवी कोण?
20 वर्षीय समीर रिझवी हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. त्याने UP T20 लीगमध्ये कानपूर सुपरस्टार्ससाठी सर्वाधिक षटकार ठोकले. त्यामध्ये दोन धडाकेबाज शतकांचाही समावेश आहे. तसेच त्याने याच स्पर्धेत नऊ डावात 455 धावा केल्या आहेत. यामुळे त्याला पंजाब किंग्जसह तीन फ्रँचायझींमध्ये चाचपण्यात आले. त्याचा एक भाग त्याचे प्रशिक्षक सुनील जोशी देखील होते. यूपीच्या 23 वर्षांखालील संघामध्ये असल्यामुळे रिझवीला फ्रँचायझी चाचण्यांना मुकावे लागले.
त्यानंतर त्याने पण 23 वर्षांखालील संघासोबतच्या त्याच्या पहिल्या खेळात त्याने राजस्थानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 65 चेंडूंत 91 धावा केल्या.त्यामुळे उत्तर प्रदेशला टूर्नामेंट जिंकण्यास मदत झाली. रिझवीने अंतिम सामन्यात 50 चेंडूत 84 धावा ठोकल्या. त्याने ही स्पर्धा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून पूर्ण केली. त्यानंतर आता आयपीएल 2024 साठी सर्वात जास्त अनकॅप्ड खेळाडूंपैकी असलेल्या रिझवीवर 8 कोटी 40 लाखांची बोली लागली.
यंदाच्या लिलावात 23 खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी
यंदाच्या लिलावासाठी दोन सहयोगी देशांतील खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. IPL 2024 साठी सर्व 10 संघांमध्ये एकूण 77 खेळाडूंची आवश्यकता आहे. याचा अर्थ 333 निवडलेल्या खेळाडूंपैकी केवळ 77 खेळाडूंचा लिलाव होईल. 333 खेळाडूंच्या यादीत 23 खेळाडू आहेत ज्यांची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. तर 13 खेळाडूंची मूळ किंमत 1.5 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय 1 कोटी, 50 लाख, 75 लाख, 40 लाख, 30 लाख आणि 20 लाख रुपयांची मूळ किंमत असलेल्या खेळाडूंचाही या यादीत समावेश आहे.