Maharashtra MLAs oath taking ceremony: स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ, भाजपच्या देवेंद्र कोठेंचा व्हिडीओ व्हायरल
Maharashtra MLAs oath taking ceremony: राज्यातील 280 आमदारांचा शपथविधी पूर्ण झाला आहे. उर्वरित 8 आमदार सोमवारी आमदारकीची शपथ घेतील. राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष होणार
मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या 280 उमेदवारांनी शनिवारी आणि रविवारी विधानसभेत आमदारकीची शपथ घेतली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी या सर्व आमदारांना पदाची शपथ दिली. आता केवळ 8 जणांचा शपथविधी बाकी आहे. रविवारी अनेक आमदारांनी शपथ घेतली. यावेळी भाजपचे आमदार देवेंद्र सुहास कोठे (MLA Suhas Kothe) यांचा शपथविधी अनेकांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. सुहास कोठे यांनी श्रीराम आणि स्वामी समर्थांचे (Swami Samarth) नाव घेऊन शपथेची सुरुवात केली. याशिवाय, शिवसेना आमदार आमशा पाडवी यांच्या शपथविधीचीही चांगलीच चर्चा रंगली. आमशा पाडवी हे शपथ घेताना अनेकदा अडखळले. आमदार असलेल्या आमशा पाडवी यांना जराशीही अक्षरओळख नसल्याने हंगामी विधानसभा अध्यक्षांना शपथेतील प्रत्येक शब्द वाचून दाखवावा लागला. हंगामी विधानसभा अध्यक्षांनी एक शब्द उच्चारल्यावर त्यांच्यापाठोपाठ आमशा पाडवी तो शब्द बोलायचे. अशाप्रकारे संपूर्ण शपथ पार पडली.
दरम्यान, आज उर्वरित 8 आमदारांचा शपथविधी संपन्न होईल. या आमदारांचा शपथविधी सभागृहात होणार की विधानसभा अध्यक्षांच्या दालनात होईल, याबाबत अद्याप निश्चित माहिती नाही. सकाळी 11 वाजता शपथविधीला सुरुवात होईल. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाईल. भाजपच्या राहुल नार्वेकर यांनी रविवारी विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांच्याविरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज ते विधानसभा अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतील. यानंतर संध्याकाळी साडेचार वाजता विधिमंडळात राज्यपालांचे अभिभाषण होईल. त्यानंतर शोक प्रस्ताव सादर करण्यात येतील. आजच्या अधिवेशनात नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाचा कार्यक्रम निश्चित होईल आणि त्यानंतर राष्ट्रगीताने विधानसभेच्या विशेष अधिवेशनाची सांगता होईल.
आमदार देवेंद्र कोठे शपथ घेताना नेमकं काय म्हणाले?
जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, श्री पांडुरंगांना वंदन करतो. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर, कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनी, त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सर्व महापुरुषांना वंदन करतो, माझे आजोबा स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांना स्मरण करत आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर श्रद्धा ठेवत मी शपथ घेतो की, मी देवेंद्र सुहास राजेश कोठे सोलापूर शहर मध्य विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आल्याने ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमत्वता व एकात्मता उन्नत राखीन. जे कर्तव्य हाती घेणार आहे, ते निष्ठेने पार पाडेन. धन्यवाद. जय गोमाता, भारत माता की जय, वंदे मातरम.
आणखी वाचा