MI vs DC : तिलक वर्मानं राजधानी गाजवली,मुंबईची धावसंख्या 200 पार, दिल्ली कॅपिटल्सचा विजयरथ रोखणार?
MI vs DC : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमने सामने आले आहेत. मुंबई इंडियन्सनं दिल्लीपुढं धावांचा डोंगर उभा केला आहे.

नवी दिल्ली : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर मॅच सुरु आहे. मुंबईनं दिल्लीपुढं 205 धावा करण्यात यश मिळवलं आहे. रेयान रिकल्टन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर आणि रोहित शर्मा यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं 200 धावांचा टप्पा ओलांडला. मुंबईनं 20 ओव्हरमध्ये 5 बाद 205 धावा केल्या. मुंबईकडून तिलक वर्मानं 59 धावा केल्या. यामुळं दिल्लीला आता विजय मिळवायचा असल्यास 206 धावा कराव्या लागतील. दिल्ली कॅपिटल्सचा विजयरथ रोखण्यात मुंबईला यश येतं का ते पाहावं लागेल.
दिल्ली कॅपिटल्सनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि रेयान रिकल्टन यांनी डावाची सुरुवात केली. दोघांनी मुंबईसाठी 47 धावांची सलामीची भागिदारी केली. रोहित शर्मानं 18 धावा केल्या, तर रेयॉन रिकल्टन यानं 41 धावा केल्या. यानंतर सूर्यकुमार यादवनं 40 धावा करत संघाच्या धावसंख्येचा वेग वाढवला.
तिलक वर्मा यानं 33 बॉलमध्ये 3 षटकार आणि 6 चौकार मारत 59 धावा केल्या. कर्णधार हार्दिक पांड्या मोठी धावसंख्या करु शकला नाही. नमन धीर यानं 2 षटकार आणि 3 चौकार मारत 38 धावा केल्या. या सर्वांच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबईनं 20 ओव्हरमध्ये 5 बाद 205 धावा केल्या.
तिलक वर्मानं सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावत मुंबईच्या धावसंख्येत मोठा वाटा उचलला.
दिल्ली कॅपिटल्सचा विजयरथ रोखणार?
दिल्ली कॅपिटल्सनं आतापर्यंत लखनौ सुपर जायंटस, चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायजर्स हैदराबादला पराभूत करत गुणतालिकेत पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. सध्या दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स आतापर्यंत अजिंक्य आहे. आज मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटल्सचा विजयरथ रोखण्यात यश येतं का ते पाहावं लागेल.
दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई
दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची धुलाई आज मुंबई इंडियन्सच्या फंलदाजांनी केली. दिल्लीचा मुख्य गोलंदाज मिशेल स्टार्कला आज एकही विकेट मिळाली नाही. कुलदीप यादव वगळता इतर गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. मिशेल स्टार्कनं 3 ओव्हरमध्ये 43 धावा दिल्या. तर, मुकेश कुमारनं 38 धावा देत एक विकेट घेतली. विपराज निगमनं 4 ओव्हर टाकत 41 धावा देत 2 विकेट घेतल्या तर कुलदीप यादवनं 2 विकेट घेतल्या.





















