CSK Vs RCB: 'दोन-तीन गोष्टींवर काम करायचंय'; सामना जिंकल्यानंतरही ऋतुराज नाखुश, नेमकं काय म्हणाला?
Ruturaj Gaikwad After Winning Match: चेन्नईचं कर्णधारपद स्वीकारल्यानंतर ऋतुराज गायकवाड हा पहिलाच विजय होता. सामना जिंकल्यानंतर ऋतुराज गायकवाडने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.
Latest Marathi News: CSK Vs RCB: IPL 2024: गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्सने (Chennai SuperKings) आयपीएलच्या 17व्या सत्रात विजयी सलामी देताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (Royal Challengers Bengaluru) 6 गड्यांनी नमवले. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 6 बाद 173 धावांची मजल मारल्यानंतर चेन्नईने 18.4 षटकांत 4 बाद 176 धावा केल्या. चेन्नईच्या फलंदाजांनी सांघिक कामगिरी करत विजय मिळवला. यंदाच्या सत्रापासून चेन्नईचा नवा कर्णधार बनलेल्या ऋतुराज गायकवाडने विजयी नेतृत्व केले.
चेन्नईचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. त्याने 4 षटकांत 29 धावा देत 4 विकेट्स पटकावल्या. विशेष म्हणजे त्याने झटपट आरसीबीच्या फलंदाजांना बाद केले. दरम्यान चेन्नईचं कर्णधारपद स्वीकारल्यानंतर ऋतुराज गायकवाड हा पहिलाच विजय होता. सामना जिंकल्यानंतर ऋतुराज गायकवाडने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. तसेच काही गोष्टींवर काम करावे लागणार असल्याचे देखील त्याने सांगितले.
ऋतुराज गायकवाड म्हणाला की, आम्ही पहिल्यापासून नियंत्रणात होतो. सर्वांनी चांगला खेळ केला. आरसीबीचा ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डुप्लेसिस लवकर माघारी पाठवल्याने संघाला फायदा झाला. आम्हाला तीन झटपट विकेट मिळाल्या आणि त्यामुळे आम्हाला पुढील षटकांवर नियंत्रण ठेवण्यात मदत झाली, हाच खरा टर्निंग पॉइंट होता. मी कर्णधारपदाचा आनंद लुटला. अतिरिक्त दबाव म्हणून मला कधीच वाटले नाही. मला ते कसे हाताळायचे याचा अनुभव आहे. मला कधीही दबाव जाणवला नाही, अर्थातच माही भाई देखील होता, असं ऋतुराजने सांगितले.
दोन-तीन गोष्टींवर काम करायचे आहे-
ऋतुराज पुढे म्हणाला की, आमच्या संघातील प्रत्येकजण नैसर्गिक स्ट्रोकप्लेअर आहे, असं मला वाटतं. जिंक्स (अजिंक्य रहाणे) देखील खरोखर सकारात्मक खेळत आहे. प्रत्येकाला त्यांची भूमिका आणि कोणत्या गोलंदाजांना सामोरे जायचे हे माहित आहे. दोन-तीन गोष्टींवर काम करायचे आहे, प्रत्येकाने चांगली फलंदाजी केली. पण मला वाटते की पहिल्या 3 मधील फलंदाजांनी 15 व्या षटकापर्यंत फलंदाजी केली तर ते आणखी सोपे झाले असते.
A Winning Start in #TATAIPL 2024 ✅
— IndianPremierLeague (@IPL) March 22, 2024
A Winning Start at home in Chennai ✅
The Defending Champions Chennai Super Kings seal a 6⃣-wicket victory over #RCB 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/4j6FaLF15Y #CSKvRCB | @ChennaiIPL pic.twitter.com/DbDUS4MjG8
ऋतुराज चेन्नईला सहाव्यांदा विजेतेपद मिळवून देणार?
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई सुपर किंग्जनं पाचवेळा विजेतेपद मिळवलं आहे.2010, 2011, 2018, 2021 आणि2023 च्या आयपीएलमध्ये चेन्नईनं विजेतेपद मिळवलं होतं.गेल्यावर्षी दुखापतग्रस्त असताना देखील धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नईनं विजेतपद मिळवलं होतं. चेन्नईनं अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. आता महेंद्रसिंह धोनी ऐवजी संघाच्या नेतृत्त्वाची धुरा ऋतुराज गायकवाड याच्याकडे आली आहे.2024 च्या आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवून देण्याचं आव्हान ऋतुराज गायकवाड समोर असेल.