Virat Kohli : ग्राऊंडवरील पंचांसोबत वाद घालणं महागात पडलं, विराट कोहलीला बीसीसीआयचा दणका, मोठा दंड भरावा लागणार
Virat Kohli : आयपीएलमध्ये काल झालेल्या मॅचमध्ये पंचांसोबत वाद घालणाऱ्या विराट कोहलीला आयपीएलकडून मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. विराट कोहलीला बाद देण्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे.
कोलकाता : आयपीएलमध्ये (IPL 2024) काल झालेल्या मॅचमधील विराट कोहलीच्या (Virat Kohli) विकेटचा मुद्दा अजून संपलेला नाही. कोलकाता नाईट रायडर्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पहिल्यांदा बॅटिंग करताना 6 विकेटवर 222 धावा केल्या होत्या. आरसीबीकडून या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस या दोघांकडून डावाची सुरुवात करण्यात आली होती. विराट कोहलीनं आक्रमक सुरुवात केली होती. विराट कोहलीनं 2 सिक्स आणि 1 चौकार मारुन 7 बॉलमध्ये 18 धावा केल्या होत्या. हर्षित राणानं टाकलेल्या फुलटॉसवर विराट कोहली बाद झाला. विराट कोहलीनं डीआरएस मागितला, थर्ड अंम्पायरनं देखील विराट कोहलीच्या विरोधात निर्णय दिला. यानंतर विराट कोहलीनं मैदानावरील पंचांसोबत वाद घातला. या प्रकरणी आता आयपीएलनं मोठी कारवाई केली आहे.
विराट कोहलीनं बाद दिल्यानंतर काल ईडन गार्डन्सवर पंचांसोबत वाद घातला होता. या वादाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु होती. विराटच्या बाजूनं आणि विराट कोहलीच्या विरोधात अशा दोन गटांमध्ये क्रिकेट चाहते, माजी क्रिकेट खेळाडू विभागले गेले आहेत. दुसरीकडे विराट कोहलीवर बीसीसीआयनं मोठी कारवाई केली असल्याची माहिती मिळाली आहे. विराट कोहलीला आयपीएलच्या शिस्तीसंदर्भात नियमांचं उल्लंघन केल्यानं मॅच फीसच्या 50 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.
Virat Kohli fined 50% of his match fees for breaching IPL Code Of Conduct. pic.twitter.com/utOLnzWjG9
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 22, 2024
आरसीबीच्या डावाच्या तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर विराट कोहलीला कॅच आऊट देण्यात आलं होतं. विराट कोहलीनं हर्षित राणानं टाकलेला बॉल हा फुलटॉस असल्यानं पंचांच्या निर्णयाविरुद्ध अपील केलं आणि दाद मागितली. तिसऱ्या अंम्पायरनं देखील मैदानावरील पंचांचा निर्णय कायम ठेवला. यानंतर विराट कोहलीच्या संतापाचा पारा चढला. विराट कोहलीनं थेट मैदानावरील पंचांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. विराट कोहली पंचांसोबत वाद घालत असताना आरसीबीचा कॅप्टन फाफ डु प्लेसिस हे सर्व पाहत होता.
विराट कोहलीला मॅच फीच्या 50 टक्के रक्कम आयपीएलच्या दंडापोटी भरावी लागणार आहे. विराट कोहलीवरील कारवाईचे देखील काय पडसाद उमटतात हे पाहावं लागेल. इरफान पठाणनं पंचांचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं तर नवज्योतसिंह सिद्धूनं विराटची बाजू बरोबर असल्याचं म्हटलं.
आरसीबीचा एका धावेनं पराभव
कोलकाता नाईट रायडर्सनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 6 बाद 222 धावा केल्या होत्या. आरसीबीच्या रज्त पाटीदार आणि विल जॅक्स यांनी डाव सावरत अर्धशतकं केली होती. मात्र, आरसीबीच्या नियमित अंतरानं विकेट गेल्या आणि त्यांचा संघ 221 धावांपर्यंत मजल मारु शकला.
संबंधित बातम्या :