Pradnya Satav: प्रज्ञा सातवांचा काँग्रेसच्या विधापरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा! विधीमंडळ सचिवांकडे राजीनामा सुपूर्द
Pradnya Satav Resigns From Congress: गेल्या काही दिवसांपासून प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. आज भाजपमध्ये अधिकृत प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.

Pradnya Satav Resigns From Congress: काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी आज (18 डिसेंबर) काँग्रेस आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा विधीमंडळ सचिवांकडे सादर केला असून, त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. आज (18 डिसेंबर) त्यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान, काँग्रेस विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या पक्षप्रवेशाबाबत तथ्य नसल्याचे म्हटले असले, तरी प्रज्ञा सातव यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राजकीय समीकरणांना वेग आला आहे. स्वर्गीय राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेवर संधी दिली होती. राजीव सातव हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते. मात्र, कोरोना महामारीदरम्यान त्यांच्या अकाली निधनामुळे काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली होती.
प्रज्ञा सातव यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी
दरम्यान, प्रज्ञा सातव आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी समर्थकांसह आल्या आहेत. हिंगोलीतून आलेल्या कार्यकर्त्यांनी प्रज्ञा सातव यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. 'राजीव सातव अमर रहे' म्हणत नारे देण्यात आले. हिंगोलीतून मोठ्या प्रमाणात सातव यांचे कार्यकर्ते भाजप कार्यालयात दाखल झाले आहेत.
कोण आहेत प्रज्ञा सातव?
डॉ. प्रज्ञा सातव या दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष होत्या आणि सध्या विधानपरिषदेच्या आमदार होत्या. 2021 मध्ये काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्या विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्या काँग्रेसकडून दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर निवडून आल्या होत्या. त्यांचा कार्यकाळ 2030 पर्यंत होता. मात्र, आज दिलेल्या राजीनाम्यामुळे त्यांचा काँग्रेसमधील प्रवास थांबला आहे.
कोण होते राजीव सातव?
राजीव सातव हे राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. 2014 च्या मोदी लाटेत महाराष्ट्रातून काँग्रेसचे केवळ दोन खासदार निवडून आले होते, त्यात राजीव सातव यांचा समावेश होता. त्यांनी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, राज्यसभा सदस्य अशी विविध पदे भूषवली होती. तसेच युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरातचे प्रभारी आणि काँग्रेस कार्य समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या.
इतर महत्वाच्या बातम्या
























