आयपीएल फुकटात कशी, कधी अन् कुठे पाहावी?; जाणून घ्या....
IPL 2024: RCB Vs CSK: चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल.
IPL 2024: RCB Vs CSK: चेन्नई सुपरकिंग्स (Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) यांच्यात आज आयपीएल 2024ची लढत होणार आहे. यावेळी चेन्नईतील चेपॉक मैदानावर आयपीएलचा उद्घाटन सोहळा होणार आहे. या सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, टायगर श्रॉफ आणि प्रसिद्ध गायक ए. आर. रहमान परफॉर्मन्स सादर करणार आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. त्यापूर्वी हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
उद्घाटन समारंभाचे लाईव्ह स्ट्रीमिंग केव्हा अन् कुठे पाहता येणार?
तुम्ही जिओ सिनेमावर आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकाल. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, चाहत्यांना Jio सिनेमावर 14 भाषांमध्ये आयपीएल सामन्यांचा आनंद घेता येणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना आपल्या आवडत्या भाषेत सामने पाहता येतील. यासाठी चाहत्यांना सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार नाही, म्हणजेच त्यांना पैसे द्यावे लागणार नाहीत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर चाहत्यांना जिओ सिनेमावर संपूर्ण आयपीएल विनामूल्य पाहता येणार आहे. याशिवाय टिव्हीवर तुम्हाला स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.
चेन्नईत हवामान कसं असणार?
21 मार्च रोजी चेन्नईमध्ये पाऊस अपेक्षित होता, परंतु शुक्रवार, 22 मार्च रोजी हवामान सामान्य होणार आहे. परंतु मैदानातील आर्द्रता 75 टक्के असणार आहे, जी खेळाडूंसाठी समस्या बनू शकते. सामन्याच्या वेळी तापमान 31 अंश असू शकते आणि वाराही ताशी 18 किमी वेगाने वाहण्याची शक्यता आहे.
खेळपट्टी कशी असणार?
चेपॉक स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाल्यास, जसजसा वेळ जातो तसतशी खेळपट्टी मंद होत जाते, त्यामुळे नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यास आश्चर्य वाटायला नको.चेन्नईकडे मोईन अली, रवींद्र जडेजा आणि महिष तिक्षानासारखे काही दर्जेदार फिरकीपटू आहेत, जे आरसीबीच्या आक्रमक फलंदाजांपुढे समस्यांचे कारण बनू शकतात.
चेन्नई सुपर किंग्समध्ये कोण कोणते धुरंधर -
एमएस धोनी (कर्णधार), मोइन अली, दीपक चाहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिशेल सँटनर, सिमरजीत सिंह, निशांत सिंधु, प्रशांत सोलंकी, महेश तिक्ष्णा, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकुर, डेरिल मिशेल, समीर रिजवी, मुस्तफिजुर रहमान, अवनीश राव अरावली
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा ताफ्यात कोण कोण ?
फाफ डु प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजयकुमार वैश्यक, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टॉपले, हिमांशु शर्मा, राजन कुमार, कॅमरून ग्रीन, अल्ज़ारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्यूसन, स्वप्निल सिंह, सौरव चौहान