(Source: ECI/ABP News/ABP Majha)
GT vs RR, IPL 2023: मिलरची किलर खेळी, गुजरातची 177 धावांपर्यंत मजल
GT vs RR, IPL 2023 : डेविड मिलर याने अखेरच्या षटकात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला.
GT vs RR, IPL 2023 : डेविड मिलर आणि अभिनव मनोहर यांच्या वादळी खेळीच्या जोरावर गुजरातने निर्धारित 20 षटकात सात विकेटच्या मोबदल्यात 177 धावांपर्यंत मजल मारली. अखेरच्या षटकात डेविड मिलर याने 46 तर अभिनव मनोहर याने 27 धावांची महत्वाची खेळी केली. राजस्थानला विजयासाठी 278 धावाची गरज आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थानचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातची सुरुवात अतिशय खराब झाली. वृद्धीमान साहा पहिल्याच षटकात बाद झाला. ट्रेंट बोल्ट याने साहा याचा अडथळा दूर केला. त्यानंतर साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी गुजरातचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी साई सुदर्शन धावबाद झाला. साई सुदर्शन याने १९ चेंडूत दोन चौकारासह २० धावांचे योगदान दिले. साई सुदर्शन बाद झाल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने मोर्चा सांभाळला... एका बाजूला शुभमन गिल किल्ला लढवत होता. दुसऱ्या बाजूने हार्दिक पांड्याने आक्रमक रुप धारण केले. हार्दिक पांड्याचा अडथळा युजवेंद्र चहल याने दूर केला. हार्दिक पांड्याने १९ चेंडूत २८ धावांची खेळी केली. या खेळीत हार्दिक पांड्याने एक षटकार आणि तीन चौकार लगावले.
हार्दिक पांड्या बाद झाल्यानंतर शुभमन गिलही फार काळ मैदानात टिकू शकला नाही. शुभमन गिल याला संदीप शर्मा याने झेलबाद केले. शुभमन गिल याने सुरुवातीपासूनच संयमी फलंदाजी केली. शुभमन गिल याने ३४ चेंडूत ४५ धावांची खेळी केली. या खेळीत एक षटकार आणि चार चौकारांचा समावेश आहे.
मिलर-अभिनव मनोहर यांची आक्रमक खेळी -
शुभमन गिल बाद झाल्यानंतर डेविड मिलर आणि अभिनव मनोहर यांनी गुजरातची धावसंख्या वेगाने वाढवली. दोघांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. अभिनव मनोहर याने १३ चेंडूत २७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने तीन षटकार लगावले. तर डेविड मिलर याने ३० चेंडूत ४६ धावांची खेळी कली. या खेळीत मिलरने दोन षटकार आणि तीन चौकार लगावले. राशिद खान पहिल्याच चेंडूवर धावबाद झाला. राहुल तेवातिया एका धावेवर नाबाद राहिला.
राजस्थानकडून संदीप शर्मा याने सर्वात भेदक मारा केला. संदीप शर्मा याने चार षटकात २५ धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. त्याशइवाय ट्रेंट बोल्ट, अॅडम जम्पा आणि चहल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.