(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2021, Qualifier 1 : तरुण तुर्क विरुद्ध अनुभवी अर्क; IPLची अंतिम फेरी गाठण्यासाठी भिडणार गुरु-शिष्य, पहिल्या क्वालिफायरमध्ये दिल्ली-चेन्नई आमनेसामने
IPL 2021, Qualifier 1 : आज आयपीएलच्या मैदानात गुरु-शिष्य एकमेकांविरोधात भिडणार आहेत. पहिल्या क्वालिफायरमध्ये दिल्ली (Delhi Capitals) आणि चेन्नई (Chennai Super Kings) आमनेसामने खेळताना दिसणार आहेत.
Delhi Capitals vs Chennai Super Kings Qualifier 1 : आज (रविवारी) आयपीएल (IPL) च्या मैदानात ऋषभ पंतच्या नेतृत्त्वात खेळणारी दिल्ली कॅपिटल्स आणि एमएस धोनीच्या नेतृत्त्वात खेळणारी चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आयपीएल 2021 चा पहिला क्वॉलीफायर सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी साडेसात वाजता खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात जिंकणारा संघ अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. तर पराभूत होणारा संघ एलिमिनेटर सामन्यातील विजेत्या संघासोबत दुसरा क्वॉलीफायर सामना खेळेल. जाणून घेऊया, या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची प्लेइंग इलेव्हन कशी असेल?
दिल्ली चेन्नईवर मात करणार?
दिल्ली कॅपिटल्सनं जरी लीग स्टेजमध्ये 10 सामने जिंकले असतील, परंतु, संघातील फलंदाज फारशी उत्तम खेळी करताना दिसले नाहीत. पृथ्वी शॉ (401 धावा) आणि शिखर धवन (544 धावा) या दोघांव्यतिरिक्त युएईतीर आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात इतर फलंदाज फारशी चांगली खेळी करु शकले नाहीत. कर्णधार ऋषभ पंत (362 धावा) काही प्रमाणात उत्तम खेळी करताना दिसला.
मार्कस स्टोइनिस दुखापतग्रस्त झाल्यामुळे दिल्लीच्या संघाचं संतुलन बिघडलं गेलं आहे. शिमन हेटमायरनं डेथ ओव्हर्समध्ये उत्तम खेळी केली. परंतु, इतर फलंदाज उत्तम खेळी करण्यात अयशस्वी ठरले. दिल्लीच्या संघाची भक्कम बाजू म्हणजे, त्यांच्या गोलंदाजांची फळी. आवेश खान (22 विकेट), अक्षर पटेल (15 विकेट), कगीसो रबाडा (13 विकेट) आणि एनरिक नोर्किया (09 विकेट) यांनी आतापर्यंत आपली भूमिका उत्तमरित्या निभावली आहे.
मार्कस स्टोयनिस करणार वापसी
रिपोर्ट्सनुसार, या सामन्यात दिल्लीच्या संघातील स्टार खेळाडू ऑलराउंडर मार्कस स्टोयनिस वापसी करु शकतो. स्टोयनिसला दुखापत झाल्यानंतर दिल्लीच्या संघाचं संतुलन बिघडलं होतं. परंतु, या महत्त्वाच्या सामन्यामुळं त्याचं संघात पुनरागमन होऊ शकते.
चेन्नई बाजी मारणार?
अनेक अनुभवी खेळाडूंचा समावेश असणारा चेन्नईचा संघ आजचा सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. गतवर्षी प्लेऑफपासून लांब राहिलेल्या चेन्नईनं यावर्षी प्लेऑफमध्ये आपलं स्थान निर्माण केलंय. आतापर्यंत चेन्नईचा संघ 12 आयपीएल खेळला आहे. त्यापैकी 11 वेळा चेन्नईनं प्लेऑफमध्ये धडक दिली आहे. तसेच चेन्नईचा संघ आतापर्यंत आठ वेळा अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यापैकी तीन वेळा अंतिम सामन्यात चेन्नईनं विजयही मिळवला आहे. संघ व्यवस्थापनही संघातील अनुभवी खेळाडूंवर विश्वास ठेवत फारसे बदल करत नाही. त्यामुळे आजच्या सामन्यातही चेन्नई आपल्या अनुभवी खेळाडूंसह मैदानत उतरणार आहे.
असे असू शकतात संभाव्य संघ :
दिल्लीचा संभाव्य संघ : शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), मार्कस स्टोइनिस, शिमरन हेटमायर, अक्षर पटेल, आर अश्विन, कगीसो रबाडा, एनरिक नॉर्टजे आणि आवेश खान.
चेन्नईचा संभाव्य संघ : फाफ डू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), रविंद्र जाडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर आणि जोश हेजलवुड.