CSK vs GT Qualifier 1 : धोनीचा अनुभव की पांड्याची आकडेवारी, कोण ठरणार वरचढ? अंतिम फेरीच्या तिकीटासाठी जंगी सामना
CSK vs GT, IPL 2023 Qualifier 1 : आयपीएल 2023 च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये आज चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रणसंग्राम पाहायला मिळणार आहे.
CSK vs GT, IPL Qualifier 1 : इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या (IPL 2023) पहिल्या क्वालिफायरमध्ये (IPL Qualifier 1) आज चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. आयपीएलमध्ये चेन्नई (Chennai Super Kings) संघाने चार वेळा अंतिम विजेतेपद पटकावलं आहे. तर गतविजेत्या गुजरात टायटन्स (Gujrat Titans) संघाला सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन होण्याची संधी आहे. या परिस्थितीत धोनीचा अनुभवापुढे गुजरातच्या आकडेवारीचं आव्हान असेल उभे राहतील का, हे जाणून घेऊया.
अंतिम फेरीच्या तिकीटासाठी गुजरात आणि चेन्नई आमने-सामने
इंडियन प्रीमियर लीग 2023 चा पहिला क्वालिफायर सामना आज चेन्नईच्या चेपॉक मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. या रोमांचक लढतीसाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहे. या मोसमात सुरुवातीपासून गतविजेत्या गुजरात संघाची दमदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. गुजरात संघाचे साखळी 14 सामन्यांपैकी एकूण 10 सामने जिंकले असून 20 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं. दुसरीकडे, चार वेळा विजेतेपद पटकावलेल्या चेन्नई संघाने 14 पैकी आठ सामने जिंकून 17 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश केला. गुणतालिकेत चेन्नई दुसऱ्या स्थानावर आहे. गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानावर असलेल्या संघांना पहिल्या क्वालिफायरमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.
धोनीचा अनुभव की पांड्याची आकडेवारी, कोण ठरणार वरचढ?
आयपीएल 2023 मधील पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात आणि चेन्नई संघ भिडतील आणि विजेता संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. तर पराभूत होणाऱ्या संघाला अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी आणखी एक संधी असेल. गुजरातने अंतिम फेरीत प्रवेश करून विजय मिळवल्यास गुजरात सलग दुसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावणारा संघ बनेल. तसेच, चेन्नई संघाला पाचव्यांदा चॅम्पियनचा होण्याची संधी आहे.
धोनीचा अनुभव पांड्यावर भारी
आयपीएलमधील पदार्पणाच्या मोसमापासून गुजरात टायटन्सची कामगिरी दमदार आहे. संघाने पहिल्याच हंगामात विजेतेपदावर नाव कोरलं. मात्र, यावेळी प्लेऑफमध्ये त्याची स्पर्धा आयपीएलचा प्लेऑफ सामना खेळण्यात माहिर असलेल्या संघाशी होणार आहे. चेन्नई संघ आणि कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा अनुभव गुजरात संघ आणि कर्णधार हार्दिक पांड्यापेक्षा खूप जास्त आहे. चेन्नई संघाने आयपीएलमध्ये विक्रमी वेळा म्हणजेच 12 व्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय चेन्नई संघाने नऊ वेळा अंतिम फेरीत प्रवेश असून चार वेळा विजेतेपदाला गवसणी घातली आहे.
आकडेवारीत गुजरातचं पारड जड
आज पहिल्या क्वालिफायरमध्ये आज धोनीचा चेन्नई संघ आणि पांड्याचा संघ समोरा-समोर उभे ठाकतील. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात चेन्नई आणि गुजरात हे संघ तीन वेळा आमने-सामने उतरले आहेत. यामध्ये गुजरात संघाचं पारड जड आहे. गुजरात संघांने चेन्नई विरोधातील सर्व तीन सामने जिंकले आहेत. यंदाच्या मोसमात सलामी सामन्यातील पराभवाचा वचपा काढून अंतिम फेरीत प्रवेश करण्याची संधी चेन्नई संघाला आज मिळणार आहे. गुजरात चेन्नईवर पुन्हा एकदा मात करतो का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.