IPL 2021 | कोरोना महामारीमुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू भयभीत, अनेकांची आयपीएल सोडण्याची इच्छा
आयपीएलमध्ये खेळत असलेले ऑस्ट्रेलियन खेळाडू देशातील कोरोनाच्या स्थितीमुळे चिंतीत आहेत. सिडनी हेरॉल़्डच्या वृत्तानुसार, अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडू ऑस्ट्रेलियन सरकारने भारतातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी केल्याने घाबरले आहेत.
IPL 2021 : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. अशातही आयपीएल स्पर्धा सुरु आहे. जगभरातील विविध देशांचे खेळाडू यामध्ये सहभागी आहे. मात्र अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडू कोरोनाच्या भीतीमुळे आयपीएल सोडू इच्छित आहेत. भारतात वाढत्या कोरोनाच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांना ऑस्ट्रेलियात प्रवेश मिळणार नाही, अशी भीती त्यांना आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज अँड्र्यू टायने वैयक्तिक कारणास्तव आयपीएलमधून आधीच माघार घेतली आहे.
सिडनी हेरॉल़्डच्या वृत्तानुसार, अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडू ऑस्ट्रेलियन सरकारने भारतातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी केल्याने घाबरले आहेत. भारतात कोरोनाबाधितांची आकडेवारी रोज नवनवे उच्चांक गाठत आहे. अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. देशात आज एकूण 3 लाख 52 हजार 991 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर 2 हजार 812 कोरोनाबाधितांचा मृत्यूही झाला.
'भीतीदायक कोरोना तरीही IPL सुरु, भारताला माझ्या शुभेच्छा' गिलख्रिस्टच्या ट्वीटची चर्चा
कोलकाता नाइट रायडर्सचा मेंटॉर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज डेव्हिड हसीचा हवाला देताना वृत्तपत्रात म्हटलं आहे की, प्रत्येक जण (ऑस्ट्रेलियन खेळाडू) ऑस्ट्रेलियामध्ये परत येऊ शकतो की नाही याबद्दल थोडे विचारात आहेत. खेळाडूंना ऑस्ट्रेलिया परत येण्याची थोडी काळजी असेल. भारतात काय घडत आहे याबद्दल प्रत्येकजण खूप चिंतीत आहे आणि ते व्यावहारिक देखील आहेत.
आयपीएलमध्ये 16 ऑस्ट्रेलियन खेळाडू
स्टीव्ह स्मिथ (दिल्ली कॅपिटल), डेव्हिड वॉर्नर (सनरायझर्स हैदराबाद), पॅट कमिन्स (कोलकाता नाइट रायडर्स), ग्लेन मॅक्सवेल (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) यांच्यासह 16 खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत. जोश हेजलवुड (चेन्नई सुपर किंग्ज), मिशेल मार्श (सनरायझर्स हैदराबाद) आणि जोश फिलिप (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) यांनी स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच आयपीएलमधून माघार घेतली होती.
सध्याच्या घडीला देशातील कोरोनास्थिती?
एकूण कोरोनाबाधित - 1 कोटी 73 लाख 13 हजार 163
एकूण मृत्यू- 1 लाख 95 हजार 123
एकूण कोरोनामुक्त - 1 कोटी 43 लाख 4 हजार 382
एकूण लसीकरण- 14 कोटी 19 लाख 11 हजार 223