IPL 2020 RRvsCSK : चेन्नई-राजस्थान सामन्यात षटकारांची बरसात, सर्वाधिक सिक्सरचं नवं रेकॉर्ड
IPL 2020 RRvsCSK : राजस्थान विरुद्ध चेन्नई सामन्यात दोन्ही संघांनी मिळून तब्बल 33 षटकार ठोकले. हे आजवरच्या कुठल्याही सामन्यात ठोकलेले सर्वात जास्त षटकार आहेत. याआधी 2018 साली बंगलोरविरुद्ध चेन्नईच्या सामन्यात एवढेच म्हणजे 33 षटकार फलंदाजांनी लगावले होते.
IPL 2020 RRvsCSK: राजस्थान रॉयल्सने सीजनची विजयी सुरुवात केली आहे. राजस्थानने चेन्नईचा 16 धावांनी पराभव केला. राजस्थानने चेन्नईसमोर 217 धावांचं आव्हान ठेवलं होतं, मात्र चेन्नईला केवळ 200 धावांपर्यंत मजल मारता आली. अबुधाबीच्या या छोट्या मैदानावर या सामन्यात षटकारांची अक्षरशा बरसातच झाली. या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून तब्बल 33 षटकार ठोकले. हे आजवरच्या कुठल्याही सामन्यात ठोकलेले सर्वात जास्त षटकार आहेत. याआधी 2018 साली बंगलोरविरुद्ध चेन्नईच्या सामन्यात एवढेच म्हणजे 33 षटकार फलंदाजांनी लगावले होते. यानंतर कालच्या सामन्यात 33 षटकार लगावले गेले.
त्यानंतर 2018 मध्ये चेन्नई विरुद्ध कोलकाता सामन्यात 31, त्याच वर्षी पंजाब विरुद्ध कोलकाता सामन्यात 31 तर 2017 साली दिल्ली विरुद्ध गुजरात सामन्यात 31 असे षटकार लगावल्याची नोंद आहे. कालच्या सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकले संजू सॅमसननं. त्याने सर्वाधिक 9 षटकार लगावले तक एक चौकार. त्यानं 32 चेंडूत 74 धावा केल्या. राजस्थानकडून संजूनंतर कर्णधार स्मिथनं चार तर जोफ्रा आर्चरनं चार असे एकूण 17 षटकार लगावले. तर चेन्नईकडून फाफ ड्यू प्लेसिसनं सात, वॉटसन चार, धोनी तीन, सॅम करननं दोन षटकार असे 16 षटकार लगावले.
नाणेफेक जिंकत चेन्नईचा कर्णधार धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानने संजू सॅमसन, कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि जोफ्रा आर्चरच्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नईसमोर 217 धावाचं आव्हान ठेवलं. सॅमसनने 32 चेंडूत 1 चौकार आणि 9 षटकारांसह 74 धावा केल्या. तर स्मिथनेही 69 धावा केल्या. तर शेवटच्या षटकात आर्चरने तुफान फटकेबाजी करत अवघ्या 8 चेंडूत 27 धावा केल्या. चेन्नईकडून सॅम करनने 3, दीपक चहर-एन्गिडी आणि पियुष चावलाने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. चेन्नईकडून फाफ ड्यू प्लेसिसने 72 धावांची खेळी केली. शेन वॉटसनने 33, मुरली विजयने 21, धोनीने 29 , केदार जाधवने 22, तर सॅम कुर्रनने 17 धावा केल्या. चेन्नईला 200 धावाच करता आल्या.
संजू सॅमसनचं मोसमातील सर्वात जलद अर्धशतक
त्याआधी संजू सॅमसनने अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक ठोकलं. आयपीएल 2020 मधील हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. सॅमसनने 32 चेंडूत एक चौकर 9 षटकारांसह 74 धावा केल्या. यासह सॅमसन आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सकडून सर्वात जलद अर्धशतक ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी राजस्थानकडून 2018 मध्ये जॉस बटलरने 18 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. तसेच चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याच्या विक्रमाशीही त्याने बरोबरी केली. याआधी केएल राहुलने 2019 मध्ये चेन्नईविरुद्ध 19 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं.
जोफ्रा आर्चरच्या दोन चेंडूत 27 धावा
राजस्थानची धावसंख्या 19 षटकात 7 गडी गमावून 186 होती. यानंतर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने शेवटच्या षटकात चेंडू लुन्गि एन्गिडीकडे सोपवला. एन्गिडीच्या पहिल्याच चेंडूवर आर्चरने जोरदार षटकार ठोकला. यानंतर पुढच्या चेंडूही आर्चर सीमेपलिकडे टोलवला. त्यानंतर एन्गिडीने पुढचा चेंडू नो बॉल टाकला. आर्चरनेही त्या चेंडूवरही षटकार ठोकला. अशा प्रकारे त्या चेंडूवर सात धावा निघाल्या. यानंतर एन्गिडीने पुढचा चेंडूही नो बॉलही टाकला, त्यावर आर्चरने पुन्हा षटकार मारला. अशा प्रकारे या चेंडूवर सात धावा निघाल्या. यानंतर एन्गिडीने वाइड बॉल टाकला. अशाप्रकारे, आर्चरने केवळ दोन चेंडूंमध्ये 27 धावा केल्या.