एक्स्प्लोर
IPL 2020, MIvsSRH : मुंबई इंडियन्सची सनरायझर्स हैदरबादवर दणदणीत मात; मुंबईचा यंदाच्या मोसमातला तिसरा विजय साजरा
मनीष पांडे आणि केन विल्यम्सन एकामागोमाग एक माघारी परतल्यानंतर हैदराबादला 209 धावांचा पाठलाग करणं कठीण गेलं. वॉर्नरनं 44 चेंडूत 60 धावांची खेळी करुन झुंज दिली.
शारजाह : रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सनं सनरायझर्स हैदराबादचा 34 पराभव करत यंदाच्या मोसमातला तिसरा विजय साजरा केला. या सामन्यात मुंबईनं दिलेल्या 209 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला 7 बाद 174 धावांचीच मजल मारता आली.
सलामीच्या जॉनी बेअरस्टोनं हैदराबादला दमदार सुरुवात करुन दिली होती. त्यानं 15 चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांसह 25 धावा फटकावल्या. त्यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि मनीष पांडेनं 60 धावांची भागीदारी रचली. पण मनीष पांडे आणि केन विल्यम्सन एकामागोमाग एक माघारी परतल्यानंतर हैदराबादला 209 धावांचा पाठलाग करणं कठीण गेलं. वॉर्नरनं 44 चेंडूत 60 धावांची खेळी करुन झुंज दिली. पण जेम्स पॅटिन्सननं त्याला माघारी धाडत मुंबईचा विजय सोपा केला. मुंबईकडून जेम्स पॅटिन्सन, जसप्रीत बुमरा आणि ट्रेन्ट बोल्टनं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तर कृणाल पंड्यानं एक विकेट घेतली.
मुंबईचा धावांचा डोंगर
त्याआधी मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनीही शारजात तुफान फटकेबाजी करत 20 षटकात पाच बाद 208 धावा कुटल्या. कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच षटकात माघारी परतला. पण त्यानंतर क्विंटन डी कॉकनं खेळाची सूत्र आपल्या हातात घेत मुंबईच्या डावाला आकार दिला. डी कॉकनं 4 चौकार आणि 4 षटकारांसह 43 चेंडूत 67 धावा फटकावल्या. त्यानंतर सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पंड्या आणि कायरन पोलार्डनंही शारजाच्या छोट्या सीमारेषांचा फायदा उठवला. सूर्यकुमारनं 27, ईशाननं 31, पोलार्डनं 25 तर हार्दिकनं 28 धावांची खेळी केली.
शारजाचं मैदान फलंदाजांसाठी लकी
यंदाच्या आयपीएलमध्ये शारजाचं मैदान फलंदाजांसाठी नंदनवन ठरतंय. आतापर्यंत शारजात खेळवण्यात आलेल्या 4 सामन्यात तब्बल 112 षटकारांची नोंद झाली आहे. दुबई आणि अबुधाबीच्या तुलनेत शारजाच्या मैदानातील सीमारेषा खूप लहान आहेत. त्यामुळेच आतापर्यंत याठिकाणी खेळवल्या गेलेल्या सामन्यात 200 पेक्षा अधिक धावांचा डोंगर उभारला गेलाय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement