IND vs AFG: आज हरलो तर भारताची सेमीफायनलची शर्यत संपणार, जिंकलो तरी 'ही' गणितं महत्वाची
IND vs AFG: T20 WC :आजचा सामना जर अफगाणिस्ताननं जिंकला तर टीम इंडिया सरळ वर्ल्डकप सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर होणार आहे. जर अफगाणिस्ताननं सामना जिंकला तर न्यूझीलंडचा संघ देखील अडचणीत येणार आहे.
IND vs AFG: T20 WC : टी-20 विश्वचषक 2021 मध्ये (T20 World Cup 2021) भारताला चांगली कामगिरी बजावता आलेली नाही. विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीत भारताला सलग दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. भारताचा दोन्ही सामन्यात पराभव झाला असला तरी भारत अजूनही स्पर्धेतून बाहेर झाला नाही. उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताला त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. तसेच इतर निकालही त्यांच्या बाजूने लागले पाहिजेत.
आज अफगानिस्तान जिंकला तर काय?
आजचा सामना जर अफगाणिस्ताननं जिंकला तर टीम इंडिया सरळ वर्ल्डकप सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर होणार आहे. जर अफगाणिस्ताननं सामना जिंकला तर न्यूझीलंडचा संघ देखील अडचणीत येणार आहे. आज सामना जिंकल्यास अफगाणिस्तानचे 4 सामन्यात 6 गुण होतील. अशात न्यूझीलंडला पुढील सर्व सामने जिंकणं अनिवार्य असेल. हे सामने चांगल्या फरकाने जिंकावे लागतील कारण अफगाणिस्तानचा नेट रनरेट न्यूझीलंडपेक्षा खूप जास्त आहे.
भारत जिंकला तर काय
भारताला आज अफगाणिस्तानविरुद्ध सामना जिंकावाच लागेल. सोबतच पुढील दोन सामन्यातही भारताला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. तर, पाकिस्तानच्या संघालाही स्कॉटलँड आणि नामीबियाविरुद्ध विजय मिळवणे आवश्यक आहे. यापैकी एकाही सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला तर, भारताला उपांत्य फेरी गाठण्यासाठी मोठी अडचण निर्माण होऊ शकते.
न्यूझीलंडची गणितंही रनरेटवर आधारीत
न्यूझीलंडने अफगाणिस्तानच्या संघाला कमी फरकाने पराभूत करणे आवश्यक आहे. तर, नामिबिया आणि स्कॉटलँडच्या संघाला न्यूझीलंडला पराभूत करावे लागणार आहे. हे सर्व निकाल भारताच्या बाजूने लागल्यास न्यूझीलंड आणि भारताचे 6 गुण होतील. या दोन्ही संघापैकी ज्यांचा रनरेट चांगला आहे, त्यांना उपांत्य फेरी गाठता येणार आहे. विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीच्या ब गटातील गुणतालिकेत पाकिस्तानचा संघ अव्वल स्थानी आहे. त्यानंतर अफगाणिस्तानचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या, नामिबिया चौथ्या, भारत पाचव्या आणि स्कॉडलँड सहाव्या क्रमांकावर आहे.
अफगाणिस्तानविरुद्ध टीम इंडियाच्या संघात बदल?
अफगाणिस्तानविरुद्ध टीम इंडियाच्या संघात अनेक बदल होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत अष्टपैलू हार्दिक पांड्याने निराशाजनक कामगिरी केलीय. त्याच्या जागेवर सुर्यकुमार यादवला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. याशिवाय, वरूण चक्रवर्तीच्या जागी रविचंद्रन अश्विनचा संघात समावेश केला जाणार, हे जवळपास निश्चित झालंय. भारतीय संघ पुढील सामन्यात कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मागील दोन्ही सामन्यात टीम इंडियाचे फलंदाज आणि गोलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.
भारत संभाव्य संघ
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, रविचंद्रन अश्विन.
अफगाणिस्तान संभाव्य संघ
मोहम्मद नबी (कर्णधार), हजरतुल्ला झझाई, अहमद शहजाद, गुलबदीन नायब, नवीन-उल-हक, रशीद खान, हमीद हसन, रहमानउल्ला गुरबाज, नजीबुल्ला जद्रान, करीम जनात, मुजीब उर रहमान.