Ind vs Jpn, Asia Cup Hockey : जपानविरुद्ध भारतीय संघाची निराशाजनक कामगिरी, 5-2 च्या मोठ्या फरकाने पराभव
IND vs JPN Asia Cup Hockey 2022 Result : हॉकी आशिया कपमध्ये आज भारतीय संघाची लढत जपान विरुद्ध होती. दरम्यान जपान संघाने भारतावर 5-2 च्या फरकाने मोठा विजय मिळवला आहे.
India vs Japan, Hockey Asia Cup : भारतीय हॉकी संघ आशिया कप 2022 स्पर्धेतील (Hero Asia Cup 2022) दुसऱ्या सामन्यात जपानकड़ून (India vs Japan) 5-2 च्या मोठ्या फरकाने पराभूत झाला आहे. पहिल्या दिवशी पाकिस्तानविरुद्ध सामना 1-1 च्या फरकाने अनिर्णीत राहिल्यानंतर आज मात्र भारत 5-2 च्या मोठ्या फरकाने पराभूत झाला. सामन्यात सुरुवातीपासून जपानच्या संघाने आपला दबदबा कायम ठेवला होता. अगदी अखेरच्या काही मिनिटांपर्यंतही जपानने गोल करत सामन्यातील आघाडी कायम ठेवली आणि 5-2 ने सामन्यात विजय मिळवला.
जपानचं सामन्यावर एकहाती वर्चस्व
सामन्याच्या सुरुवातीलाच जपानने आक्रमक पवित्रा घेतला होता. पहिल्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघाना गोल करता आला नाही. पण दुसऱ्याच क्वॉर्टरमध्ये जपानच्या यामासाकी कोजीने बॉटम कॉर्नरमध्ये चेंडू ढकलत पहिला गोल केला आहे. तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये जपानने आणखी एक यश मिळवलं. कावाबे कोसेने (Kawabe Kosei) गोल करत संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली. त्याच दरम्यान पवन राजभरने भारताकडून अप्रतिम गोल करत भारतीय संघाच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. पण नंतर पुन्हा जपानने गोल करत 3-2 ची आघाडी घेतली. 50 व्या मिनिटाला भारताने आणखी एक गोल करत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर जपानने सलग दोन करत अखेर सामना 5-2 ने जिंकत विजयश्री मिळवला.
भारताचा पुढील सामना इंडोनेशियाशी
आशिया कप 2022 मधील पूल ए मध्ये भारत, पाकिस्तान, जपानसोबत यजमान संघ इंडोनेशिया देखील आहे. तर दुसरीकडे पूल बीमध्ये मलेशिया, कोरिया, ओमान आणि बांग्लादेश हे संघ आहेत. दरम्यान भारतीय संघाचा आजचा सामना जपानशी पार पडल्यानंतर आता गुरुवारी अर्थात 26 मे रोजी भारत इंडोनेशियाशी लढणार आहे.
हे देखील वाचा-