मोठी बातमी! नव्याने निवडून आलेल्या 11 नगरसेवकांचा अख्खा गटच भाजपात, काँग्रेसला 'दे धक्का'
अंबरनाथमध्ये भाजपने काँग्रेसला मोठा धक्का देत काँग्रेसच्या 11 नगरसेवकांना आपल्या गळाला लावले आहे.

ठाणे : अंबरनाथमध्ये भाजप (BJP) आणि काँग्रेसने (Congress) केलेली युती राज्यात चर्चेत ठरली. येथील सत्ताधारी भाजपला काँग्रेस नगरसेवकांनी विकासाच्या मुद्द्यावरुन पाठिंबा दिला होता. त्यावरुन, सुरू झालेल्या राजकीय वादानंतर अखेर अंबरनाथ नगरपालिकेत मोठी घडामोड घडली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अंबरनाथमधील भाजप-काँग्रेस युतीवरुन थेट कारवाई केली आहे. येथील काँग्रेस पक्षाने नगरपालिका निवडणुकीत भाजपला समर्थन दिल्यानंतर काँग्रेसकडून येथील सर्वच नगरसेवकांचे निलंबन करण्यात आले होते. हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरुन अंबरनाथ (Ambernath) ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रदीप पाटील यांना यासंदर्भात पत्र पाठवण्यात आले. त्यानंतर , आता येथील काँग्रेसच्या तब्बल 11 नगरसेवकांनी थेट काँग्रेसला बाय करत भाजपात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे, लवकरच हा पक्षप्रवेश होणार आहे.
अंबरनाथमध्ये भाजपने काँग्रेसला मोठा धक्का देत काँग्रेसच्या 11 नगरसेवकांना आपल्या गळाला लावले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हे सर्व नगरसेवक भाजपात प्रवेश करणार आहेत. नवी मुंबईत थोड्याच वेळात हा पक्ष प्रवेश संपन्न होईल. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांची नावे समोर आली आहेत.
काँग्रेसचे हे नगरसेवक करणार भाजपात प्रवेश
प्रदीप नाना पाटील
दर्शना उमेश पाटील
अर्चना चरण पाटील
हर्षदा पंकज पाटील
तेजस्विनी मिलिंद पाटील
विपुल प्रदीप पाटील
मनीष म्हात्रे
धनलक्ष्मी जयशंकर
संजवणी राहुल देवडे
दिनेश गायकवाड
किरण बद्रीनाथ राठोड
कबीर नरेश गायकवाड
अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर आपण निवडणूक लढविली असून आपल्या पक्षाचे 12 सदस्य निवडून आलेले आहेत. मात्र, आपण प्रदेश कार्यालयास कोणतीही माहिती न देता अंबरनाथ नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांसोबत गटबंधन केल्याचे प्रसार माध्यमांद्वारे कळाले. ही बाब अत्यंत चुकीची असून पक्षशिस्तीचा भंग करणारी आहे. ही बाब लक्षात घेता प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून आपणास काँग्रेस पक्षामधून निलंबित करण्यात येत आहे. तसेच आपली ब्लॉक काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आपल्या सोबत पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या सर्व नगरसेवकांना सुध्दा पक्षामधून निलंबित करण्यात येत आहे, असे पत्रच काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी प्रमोद पाटील यांना पाठवले होते. त्यानंतर, दुसऱ्याच दिवशी नवनिर्वाचित तब्बल 11 काँग्रेस नगरसेवकांच्या गटाने भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपकडून कारवाई कधी?
अंबरनाथ येथे भाजपाप्रणीत अंबरनाथ विकास आघाडी मध्ये सामील होण्याचा प्रयत्न केला म्हणून प्रदेश काँग्रेसने काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक आणि ब्लॉक अध्यक्षावर निलंबनाची कारवाई केली. पण ज्या काँग्रेस मुक्त भारताची कामना करतात त्याच काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना भाजपाकडूनच आघाडीचा प्रस्ताव गेला असतानाही भाजपाने आपल्या नगरसेवकांवर कारवाई का केली नाही? असा सवाल काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपला विचारला आहे. अकोटमध्ये भाजपा एमआयएम सोबत जाऊन आघाडी करते. यातून स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदू महासभेने मुस्लिम लीग बरोबर अनेक प्रदेशांत सत्ता स्थापन केली त्याची आठवण झाली. दोन्ही कट्टरवाद्यांचा अजेंडा एकमेकांना पूरक असतो हे स्वातंत्र्यपूर्व काळानंतर आता पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भाजपा आणि एमआयएम पडद्याआड एकच आहेत असे आम्ही म्हणत होतो. आता हे जवळीकीचे नाते प्रकाशात आले आहे. ध्रुवीकरणाचा अजेंडा कसा राबवला जातो हे जनतेला आता कळले आहे. भाजपा हा सत्तेसाठी तत्व, नीतीमत्ता आणि विचार गुंडाळून ठेवणारा पक्ष आहे हेच खरे, अशी टीका सचिन सावंत यांनी केली.
हेही वाचा
मोठी बातमी: संजय राऊत अन् एकनाथ शिंदेंची मुंबईत भेट, एकमेकांना समोरासमोर पाहताच....




















