(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चेंडू लागला, जखमी झाला, पण मागे हटला नाही! रवी बिश्नोईनं करून दाखवलं; श्रीलंकेच्या कॅप्टनची विकेट घेतली अन्...
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सध्या टी-20 चे सामने होत आहेत. या मालिकेच्या पहिल्याच सामन्यात रवी बिश्नोई जखमी झाला. पण मागे न हटता त्यांने या सामन्यात सर्वांना थक्क करणारी कामगिरी केली.
पल्लेकेले : भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिली लढत चांगलीच थरारक ठरली. 27 जुलै रोजी श्रीलंकेत खेळवल्या गेलेल्या या सामन्यात भारताने श्रीलंकेवर 43 धावांनी विजय मिळवला.या सामन्यात भारताचा गोलंदाज रवी बिश्नोईनं जीवाची पर्वा न करता नेत्रदीपक कामगिरी केली. याच कामगिरीमुळे रवी बिश्नोईचे विशेष कौतुक होत आहे.
बिश्नोईच्या कामगिरीमुळे विजय सुकर
या सामन्यात भारताकडून सर्णधार सूर्यकुमार यादवने 58 धावांची दमदार खेळी केली. त्याने उभारलेल्या धावसंख्येमुळे भारताला विजयापर्यंत जाता आलं. पण जखमी झालेला असूनही रवी बिश्नोईने श्रीलंकेचा कर्णधार चरीथ असलंका याला बाद केलं. त्याच्या या कामगिरीमुळे भारताला विजयापर्यंत पोहोचणं आणखी सोपं झालं. रवी बिश्नोईने असलंकाला शून्यावर तंबूत पाठवलं.
जखमी झाला तरी मागे हटला नाही
रवी बिश्नोई फिरकीपटू आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामन्यात तो त्याच्या हिश्श्याचे शेवटचे षटक टाकण्यासाठी आला होता. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बळी मिळला असता. पण झेल टिपताना बिश्नोई जखमी झाला. त्याच्या उजव्या गालावर चेंडू लागला. परिणामी सामना चालू असतानाच फिजिओला बोलवावे लागले. जखमी झाल्यानंतर बिश्नोई मैदानाबाहेर जाईल अशी अपेक्षा होती. पण मागे न हटता त्याने आपले षटक पूर्ण केले. विशेष म्हणजे त्याने षटकाच्या शेवटच्या चेंडूत श्रीलंकन खेळाडूचा बळी घेतला.
सतराव्या षटकात काय घडलं?
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने 17 षटक टाकण्यासाठी रवी बिश्नोईकडे चेंडू दिला. बिश्नोईच्या पहिल्या चेंडूचा सामना कमिंदू मेंडीस करत होता. बिश्नोईच्या चेंडूवर मेंडीसने फटका मारला पण तो थेट बिश्नोईच्या हातात गेला. बिश्नोईने तो झेल टिपण्याचा प्रयत्न केला मात्र ऐनवेळी चेंडू नसटला आणि त्याच्या उजव्या डोळ्याच्या खाली गालावर लागला. या घटनेत बिश्नोई जखमी झाला. त्याच्या डोळ्याच्या खालच्या भागातून रक्तही येत होते. पण तो मागे हटला नाही. फिजिओला बोलवून बिश्नोईने जखमेवर बँडेज लावले आणि आपले षटक पूर्ण केले. विशेष म्हणजे याच षटकाच्या शेवटच्या चंडूत त्याने श्रीलंकेच्या कर्णधाराला बाद केलं. बिश्नोईने एकूण चार षटकं टाकत 37 धावा दिल्या. या सामन्यात त्याने एक बळी घेतला.
Ravi Bishnoi 🤕#INDvsSL pic.twitter.com/ATCSU2Jchl
— Richard Kettleborough (@RichKettle07) July 27, 2024
पहिल्या सामन्यात भारताचा विजय
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. तेथे भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेच्या पहिल्याच सामन्यात भारताने श्रीलंकेवर 43 धावांनी विजय मिळवला. आता दुसरा सामना 28 जुलै रोजी होणार आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी! महिला आशिया चषकाच्या अंंतिम लढतीच्या वेळेत बदल, जाणून घ्या भारत-श्रीलंका फायनल मॅच कधी?