मोठी बातमी! महिला आशिया चषकाच्या अंंतिम लढतीच्या वेळेत बदल, जाणून घ्या भारत-श्रीलंका फायनल मॅच कधी?
महिला आशिया चषकाची अंतिम लढत भारत आणि श्रीलंका या दोन संघांमध्ये होणार आहे. दरम्यान, या अंतिम लढतीची वेळ ऐनवेळी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Womens Asia Cup 2024 Final : सध्या महिला आशिया कप-2024 स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे. गेल्या काही दिवसांपासून या स्पर्धेचा थरार रंगला आहे. आता प्रतीक्षा आहे ती या स्पर्धेच्या अंतिम सामन्याची. या सामन्यात कोण बाजी मारणार आणि महिला आशिया चषक-2024 वर कोणता देश नाव कोरणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, ऐनवेळी या स्पर्धेच्या अंतिम सामन्याची वेळ बदलण्यात आली आहे.
ऐनवेळी सामन्याच्या वेळेत बदल
महिला आशिया चषकाची अंतिम लढत 28 जुलै रोजी होणार आहे. या लढतीत श्रीलंका आणि भारत आमने-सामने आहेत. हा सामना अगोदर संध्याकाळी 7 वाजता होणार होता. पण याच वेळेला भारत आणि श्रीलंका पुरूष क्रिकेट संघांमध्ये दुसरा टी-20 सामना होणार आहे. त्यामुळे दोन्ही सामने एकाच वेळी चालू होऊ नयेत तसेच क्रिकेटरसिकांना या दोन्ही सामन्यांचा आनंद लुटता यावा यासाठी महिला आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना संध्याकाळी 7 ऐवजी दुपारी 3 वाजता चालू होणार आहे.
सामना कुठे होणार?
आशिया महिला चषक स्पर्धेचा अंतिम सामना श्रीलंकेतील डॅमबुला येथील रंगिरी डॅमबुला इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ एकमेकांना भिडतील. या सामन्यात होमग्राऊंडवर भारताला नमवून इतिहास रचण्याची संधी श्रीलंकेच्या संघाला आहे. तर दुसरीकडे श्रीलंकेला धुळ चारत आशिया चषक स्पर्धेवर आठव्यांदा नाव कोरण्याची नामी संधी भारतीय संघाकडे आहे.
Playoffs spots are locked in! 🔥 How ready are you to cheer on the Lionesses? 🇱🇰 Let's show our support!#WomensAsiaCup2024 #HerStory #GoLionesses pic.twitter.com/Ozgdl1FFdY
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) July 25, 2024
उपांत्य फेरीत काय घडलं होतं?
याआधी भारताने उपांत्य फेरीत बांगलेदशवर मात केली होती. 26 जुलै रोजी हा सामना पार पडला होता. या सामन्यात भारताने तब्बल 10 गडी राखून बांगलादेशवर दणक्यात विजय मिळवला होता. तर याच दिवशी श्रीलंकेच्या महिला संघाने पाकिस्तानला तीन गडी राखून पराभूत केलं होतं. त्यानंतर आता उपांत्य फेरीत विजयी कामगिरी करणाऱ्या भारत आणि श्रीलंका या दोन संघांत 28 जुले रोजी अंतिम लढत होईल.
हेही वाचा :