IndvsBan 2nd T20 | टीम इंडियाकडून बांगलादेशचा आठ विकेट्सनी धुव्वा
बांगलादेशनं या सामन्यात भारतासमोर 154 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण रोहितच्या 85 धावांच्या खेळीमुळे टीम इडियानं हे आव्हान चेंडू आणि आठ विकेट्स राखून पार केलं. रोहितच्या खेळीत सहा चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता.
राजकोट : कर्णधार रोहित शर्माच्या दमदार खेळीच्या जोरावर टीम इंडियानं राजकोटच्या दुसऱ्या ट्वेन्टी सामन्यात बांगलादेशचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. बांगलादेशनं या सामन्यात भारतासमोर 154 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण रोहितच्या 85 धावांच्या खेळीमुळे टीम इडियानं हे आव्हान चेंडू आणि आठ विकेट्स राखून पार केलं. रोहितच्या खेळीत सहा चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता. त्यानं पहिल्या विकेटसाठी धवनच्या साथीनं 118 धावांची सलामी दिली. धवननं 28 धावांचं योगदान दिलं.
त्याआधी बांगलादेशनं 20 षटकांत सहा बाद 153 धावांची मजली होती. बांगलादेशचा सलामीवीर मोहम्मद नईमनं 36 धावा फटकावल्या. तर सौम्या सरकार आणि कर्णधार मेहमुदुल्लानं 30 धावांचं योगदान दिलं. भारताकडून यजुवेंद्र चहलनं दोन तर दीपक चहर, खलील अहमद आणि वॉशिंग्टन सुंदरनं प्रत्येकी एक विकेट घेतली. टीम इंडियाच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे बांगलादेशला दीडशेचा आकडा पार करण्यास मदत झाली.
दरम्यान राजकोट सामना टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा ट्वेन्टी ट्वेन्टी कारकीर्दीतला शंभरावा सामना होता. रोहित हा शंभर टी ट्वेन्टी सामने खेळणारा भारताचा पहिलाच तर पाकिस्तानच्या शोएब मलिकनंतर जगातला केवळ दुसराच फलंदाज ठरला आहे. रोहितनं आजवर 99 ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात सर्वाधिक 2537 धावांचा रतीब घातला आहे.