ICC U19 World Cup 2022: भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव; BCCIकडून प्रत्येक खेळाडूला 40 लाखांचं बक्षीस! गांगुली, शाह म्हणाले...
ICC U19 World Cup 2022: अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडला 4 विकेट्सनं पराभूत केलं. या शानदार विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
ICC U19 World Cup 2022: अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडला 4 विकेट्सनं पराभूत केलंय. या विजयासह भारतानं पाचव्यांदा अंडर-19 विश्वचषकावर नाव कोरलंय. या शानदार विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. संघातील प्रत्येक खेळाडूंना प्रत्येकी 40 लाखांचं बक्षीस बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलं आहे तर सपोर्ट स्टाफला प्रत्येकी 25 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. BCCIचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी देखील संघाचं अभिनंदन केलं आहे. गांगुली यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, शानदार पद्धतीने विश्वचषक जिंकल्याबद्दल 19 वर्षांखालील संघ आणि सहाय्यक कर्मचारी आणि निवडकर्त्यांचे अभिनंदन. आम्ही जाहीर केलेले 40 लाखांचे रोख पारितोषिकाचं कौतुक या खेळाडूंच्या कामगिरी आणि प्रयत्नापुढे तोकडं आहे, असं गांगुलींनी म्हटलं आहे.
Congratulations to the under 19 team and the support staff and the selectors for winning the world cup in such a magnificent way ..The cash prize announced by us of 40 lakhs is a small token of appreciation but their efforts are beyond value .. magnificent stuff..@bcci
— Sourav Ganguly (@SGanguly99) February 5, 2022
BCCIचे सचिव जय शाह यांनी म्हटलं आहे की, या शानदार विजयाबद्दल U19 टीम इंडियाचं अभिनंदन. हे खूप स्पेशल आहे. प्रत्येक खेळाडूंनी कठीण काळात इतिहास रचण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न अगदी मनापासून केले असं म्हणत शाह यांनी व्ही व्ही एस लक्ष्मण यांचंही अभिनंदन केलं आहे.
Congratulations #BoysInBlue on winning the @ICC U19 World Cup. This is a Very Very Special @VVSLaxman281 win against all odds. Each of our youngsters has shown the heart and temperament needed to make history in these trying times #INDvENG #U19CWCFinal pic.twitter.com/amuzSbarbc
— Jay Shah (@JayShah) February 5, 2022
प्रथम फलंदाजीचा निर्णय इंग्लंडच्या अंगलट
इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हाच निर्णय त्यांच्या अंगलट आला. भारताच्या रवी कुमार आणि राज बावा यांनी केलेल्या तिखट माऱ्यासमोर इंग्लंडचा संघ 189 धावांत आटोपला. इंग्लंडकडून जेम्स रियूनं 95 धावांची झुंज दिली. तर, भारताकडून बावानं 5 विकेट्स घेऊन इंग्लंडच्या डावाला सुरूंग लावला. यश धुलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ दाखवला आहे.
इंग्लंडचा डाव-
इंग्लंडकडून मैदानात उतरलेल्या सलामीवीर जेकब बेथेल आणि कर्णधार टॉ प्रिस्टला भारताचा गोलंदाज रवी कुमारनं स्वस्तात तंबूत धाडलं. या सामन्यात जेकब दोन तर, टॉम प्रिस्ट शून्यावर बाद झाला. त्यानंतर राज बावानं उत्कृष्ट गोलंदाजी करीत सलामीवीर जॉर्ज थॉमस (27 धावा), विल्यम लक्सटन (4 धावा), जॉर्ज बेल (0 धावा) रेहान अहमदला (10) बाद केलं. इग्लंडकडून जेम्स रियूनं एका बाजूनं किल्ला लढवला. परंतु, रवी कुमारच्या गोलंदाजीवर त्यानं विकेट्स गमावली. जेम्स रियूनं 95 धावांची खेळी केली. ज्यात 12 चौकारांचा समावेश होता. रियूनंतर इंग्लंड संघ जास्त काळ खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. इंग्लंडचा संघ 189 धावांवरच आटोपला. भारताकडून राज बावानं 5 विकेट्स रवी कुमारनं 4 विकेट्स मिळवले.
भारताचा डाव-
इंग्लंडनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची खराब सुरुवात झाली. भारताचा सलामीवीर अंगक्रिश रघुवंशी (0 धाव) पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर हरनूर सिंह आणि शेख रशीदनं 49 धावांची भागीदारी केली. परंतु, थॉमस ऍस्पिनवॉलच्या गोलंदाजीवर त्यानं आपली विकेट्स गमावली. यानंतर कर्णधार यश धुलनं आणि रशीद भारताचा डाव सावरला. भारतानं शतकाचा पल्ला ओलांडण्यापूर्वी जेम्स सीलनं यश आणि रशीदला माघारी धाडलं. दरम्यान, भारताला विजयासाठी 25 धावांची आवश्यकता असताना राज बावा बाद झाला. यापाठोपाठ कौशल तांबेनंही त्याची विकेट्स गमावली. मात्र, निशांत सिंधुनं एक बाजूनं पकड मजबूत ठेवली आणि भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणंल. त्यानंतर यष्टीरक्षक दिनेश बानानं 48व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर षटकार मारून भारताला अंडर-19चा विश्वचषक जिंकून दिला.
हे देखील वाचा-
- IND Vs Sri: भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिका बंगळुरूमध्येच! बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीकडून स्पष्ट
- Yash Dhull: यश धुलची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी; क्रिकेटसाठी वडिलांनी सोडली नोकरी, पेन्शनवर उदरनिर्वाह चालायचा, आता गाजवतोय मैदान
- ICC U19 World Cup: यश धुलचा उत्तुंग षटकार! टॉम व्हिटनीच्या गोलंदाजीवर चेंडू पाठवला मैदानाबाहेर, पाहा व्हिडिओ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha