टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी रणजी करंडक नव्हे आयपीएल महत्त्वाचं : दीपक चहर
रणजी करंडकाऐवजी आयपीएलवर लक्ष केंद्रित केलं तर टीम इंडियाच्या दिशेनं आपला प्रवास सहजतेनं आणि वेगानं होऊ शकतो, असे मत टीम इंडियाचा शिलेदार दीपक चहर याने मांडलं आहे.
विशाखापट्टणम : भारताचा मध्यमगती गोलंदाज दीपक चहरने आयपीएलचा आपल्या कारकीर्दीला लाभ झाल्याचे सांगून, भारतीय क्रिकेटमधल्या वास्तवाची जाणीव करून दिली आहे. रणजी करंडकाऐवजी आयपीएलवर लक्ष केंद्रित केलं तर टीम इंडियाच्या दिशेनं आपला प्रवास सहजतेनं आणि वेगानं होऊ शकतो याची आपल्याला लवकर कल्पना आली होती, असेही त्याने म्हटले आहे.
दीपक चहरने चेन्नई सुपर किंग्समधून आयपीएलच्या गेल्या दोन मोसमांवर ठसा उमटवला आहे. त्यामुळंच भारताच्या ट्वेन्टी ट्वेन्टी आणि वन डे संघांत त्याला खेळण्याची संधी मिळू शकली. दीपक चहरने आजवरच्या कारकीर्दीत तीन वन डे आणि दहा ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.
तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये दीपकला संधी मिळाली आहे. परंतु त्यात त्याला अद्याप चमकदार कामगिरी करता आलेली नाही. तीन सामन्यात त्याने केवळ दोन बळी मिळवले आहेत. 10 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 17 बळी मिळवले आहेत. 7 धावांमध्ये 6 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडून दीपकला 34 सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. त्यात त्याने 26.51 च्या सरासरीने 33 बळी मिळवले आहेत.
दीपक म्हणाला की, त्याला खूप लवकर एका गोष्टीची जाणीव झाली होती की, लाल चेंडूने 125 किमी प्रति तास वेगाने गोलंदाजी करत राहीलो तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणे अवघड जाईल. त्यामुळे मी माझ्या गोलंदाजीची स्टाईल बदलली. गती वाढवण्यासाठी मेहनत करु लागलो. मी केवळ रणजीच्या भरवशावर बसलो तर मला टीम इंडियात स्थान मिळवणे अवघड जाईल. त्यापेक्षा मी आयपीएलवर लक्ष केंद्रीत करुन मेहनत केली तर माझ्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडतील.