Mumbai Crime : चारकोपमधील व्यापाऱ्याच्या सुपारी किलिंगमागच्या कटाचा उलगडा, मित्राने पैशासाठी आणि मुलाने संपत्तीसाठी काटा काढला
Charkop Businessman Murder Case : ज्येष्ठ व्यापाऱ्याच्या हत्येसाठी साडे सहा लाखांची सुपारी देण्यात आली होती. त्यापैकी एक लाख रुपये अॅडव्हान्स देण्यात आले.

मुंबई : कांदिवली पश्चिमेतील चारकोप इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये घडलेल्या ज्येष्ठ व्यावसायिकाच्या हत्येचा (Charkop Business Murder Case) तपास पोलिसांनी अल्पावधीत उघडकीस आणला आहे. मालाड पश्चिम येथील रहिवासी 67 वर्षीय मोहम्मद आयुब मोहम्मद युनुस सय्यद यांची त्यांच्या कार्यालयामध्ये धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी शानू मुस्ताक चौधरी, मोहम्मद अली, जमिल कुरेशी अशा तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. महत्त्वाचं म्हणजे या हत्येमध्ये मयताच्या मुलाचाही समावेश असून फरार आहे.
मोहम्मद सय्यद यांची त्यांच्या फॅक्टरीच्या कार्यालयात 21 सप्टेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी तांत्रिकदृष्ट्या तपास केला आणि तीन आरोपींना अटक केली आहे.
मित्राने पैशासाठी आणि मुलाने संपत्तीसाठी सुपारी दिली
या प्रकरणाच्या तपासातून समोर आले की, मयताचा व्यावसायिक भागीदार शानू मुस्ताक चौधरी याला गुंतवणुकीचा हिस्सा परत मिळत नसल्याचा राग होता. याशिवाय, मयताचा मुलगा मोहम्मद हनिफ सय्यद याला मालमत्तेत हिस्सा न दिल्याने त्यानेही या कटात सहभाग घेतला.
या दोघांनी मिळून सुपारी देऊन हत्या करण्याचा कट रचला. त्यांनी गोवंडीतील मोहम्मद खैरूल इस्लाम कादीर अली आणि त्याचा साथीदार शहानवाज जमिल कुरेशी यांना सुपारी दिली. या हत्येसाठी तब्बल 6.50 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. यापैकी 1 लाख रुपये अॅडव्हान्स देण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले.
पोलिसांनी आतापर्यंत तिघा आरोपींना अटक केली असून चौथा आरोपी फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे. या हत्येमुळे व्यावसायिक जगतात खळबळ उडाली आहे.
Mumbai Police On Charkop Businessman Murder : पोलिसांनी काय सांगितलं?
या प्रकरणाची माहिती देताना चारकोप पोलिसांनी सांगितलं की, "21 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान फॅक्टरीच्या परिसरात मोहम्मद आयुब मोहम्मद युनुस सय्यद यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन तांत्रिक तपास केला आणि दोन संशयित निश्चित केले. त्यापैकी एकटा भिवंडीच्या परिसरात मिळाला. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याला ज्याने सुपारी दिली होती त्याची माहिती मिळाली. शानू मुस्ताक चौधरी याने त्याला साडे सहा लाखांची सुपारी दिली होती. शानू मुस्ताककडे चौकशी केल्यानंतर या हत्येमध्ये मयत मोहम्मद सय्यद याचा लहान मुलगा मोहम्मद हनिफ सय्यद याचाही समावेश असल्याची माहिती समोर आली.
आरोपी आणि शानू चौधरी हे एकमेकांच्या ओळखीचे होते, त्यांच्या आधी नेहमी भेटीगाठी व्हायच्या. शानू चौधरीच्या पैशाच्या प्रकरणानंतर त्याने दुसऱ्या आरोपीला सुपारी दिली. ज्याने सुपारी देऊन खून केला त्याच्या इतिहासाबद्दल अधिक माहिती नाही. त्याची माहिती घेण्याचं काम पोलिस करत आहेत.























