(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Davis Cup IND vs PAK: टीम इंडिया 60 वर्षांनी पाकिस्तान दौऱ्यावर; केंद्र सरकारचीही मान्यता, डेव्हिस चषकावर नाव कोरण्यासाठी धुरंधर सज्ज
Davis Cup, IND vs PAK: भारतीय संघ डेव्हिस चषकासाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. केंद्र सरकारनं पाकिस्तान दौऱ्यासाठी परवानगी दिली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील डेव्हिस चषक सामना 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी इस्लामाबादमध्ये होणार आहे.
Team India To Travel Pakistan For Dvis Cup Match: मुंबई : तब्बल 60 वर्षांनी भारतीय टेनिस संघ (Indian Tennis Team) पाकिस्तानच्या (Pakistan) दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारनं (Central Government) परवानगी दिली असून आगामी डेव्हिस चषकाच्या (Davis Cup) सामन्यांसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार आहे. पाकिस्तान उच्चायुक्तालयानं भारतीय डेव्हिस कप संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी व्हिसाही जारी केला आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील डेव्हिस चषक स्पर्धेतील जागतिक गट-1 सामना 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी इस्लामाबाद येथे खेळवला जाणार आहे.
ITF नं विनंती नाकारली
आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघानं (ITF) हा सामना तिसऱ्या देशात हलवण्याची विनंती फेटाळली होती. यानंतर अखिल भारतीय टेनिस असोसिएशननं (AITA) आपल्या संघाला पाकिस्तानला जाण्याची परवानगी देण्यासाठी सरकारकडे परवानगी मागितली होती. भारतीय टेनिस संघ दौऱ्यावर गेला नसता, तर आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघानं पाकिस्तानला वॉकओव्हर दिला असता.
In a momentous occasion, AITA President Dr. Anil Jain visited Delhi Gymkhana Club to extend his best wishes to our Davis Cup warriors. With a strong team spirit and determination, we are poised for success in the upcoming tie against Pakistan. Let's rally behind our players!🎾🇮🇳 pic.twitter.com/Nn3NeSSRRp
— All India Tennis Association (@AITA__Tennis) January 27, 2024
भारतीय संघानं डेव्हिस चषक यापूर्वी 1964 मध्ये पाकिस्तानात खेळला होता. त्यानंतर भारतीय टेनिस संघानं पाकिस्तानचा 4-0 असा पराभव केला होता. 2019 मध्ये दोन्ही संघांचा डेव्हिस चषक सामना कझाकिस्तानला हलवण्यात आला. त्यानंतर एआयटीएनं राजकीय तणावाचं कारण देत आयटीएफला बदल करण्याची विनंती केली होती. त्यावेळी आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाकडून एआयटीएची विनंती मान्य करण्यात आली होती. मात्र, यावेळी आयटीएफकडून सामना तिसऱ्या देशात हलवण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय टेनिस संघ रविवारी पाकिस्तानला रवाना होऊ शकतो.
सुमित नागलनं नाव मागे घेतलेलं, पण...
रामकुमार रामनाथन आणि एन श्रीराम बालाजी केवळ एकेरी सामनेच खेळण्याची शक्यता आहे. सुमित नागल आणि शशीकुमार मुकुंद यांनी डेव्हिस चषक सामन्यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. बालाजीनं पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, "दुहेरीतून एकेरीकडे वाटचाल करताना, बॅकहँड क्रॉसकोर्ट टाळण्याचं आव्हान आहे. मला ग्रास कोर्ट्स आवडतात आणि जेव्हा मी एकेरी खेळायचो, तेव्हा मी फक्त सर्व्ह आणि व्हॉलीवर लक्ष केंद्रित करायचो."
युकी भांबरीचे दुहेरीच्या सामन्यात खेळणं निश्चित आहे. युकीसोबत निक्की पुनाचा किंवा साकेथ मायनेनी यांना मैदानात उतरवलं जाऊ शकतं. रोहन बोपण्णा डेव्हिस कपमधून निवृत्त झाला असून तो या दौऱ्याचा भाग असणार नाही. बोपण्णानं काही तासांपूर्वी ऑस्ट्रेलियन ओपन 2024 मध्ये पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे.
रोहित बोपन्नानं ऑस्ट्रेलियन ओपन 2024चं जेतेपद पटकावलं
भारताच्या रोहन बोपन्नानं ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एबडेनच्या साथीनं ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष दुहेरीच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरून नवा इतिहास घडवला. ग्रँड स्लॅम टेनिसच्या इतिहासात विजेतेपद पटकावणारा तो सर्वात वयस्कर पुरुष टेनिसवीर ठरला. रोहन बोपन्नानं वयाच्या 43व्या वर्षी मॅथ्यू एबडेनच्या साथीनं ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावण्याची कामगिरी बजावली. बोपन्ना आणि एबडेननं अंतिम लढतीत इटालीच्या सायमन बोलेली आणि आंद्रे वावासोरी जोडीचा 7-6, 7-5 असा पराभव केला. त्या दोघांच्याही कारकीर्दीतलं हे ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष दुहेरीचं पहिलंच विजेतेपद आहे. पण रोहन बोपन्नाच्या कारकीर्दीतलं हे दुहेरीचं दुसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरलं. त्यानं 2017 साली कॅनडाच्या गॅब्रिएला डाब्रोवस्कीच्या साथीनं फ्रेन्च ओपनमध्ये मिश्र दुहेरीचं विजेतेपद पटकावलं होतं.