(Source: ECI/ABP News/ABP Majha)
West Indies vs South Africa: टी-20 विश्वचषकाआधी वेस्ट इंडिजचा धमाका; दक्षिण अफ्रिकेला अस्मान दाखवलं, 3-0 ने मालिका जिंकली!
West Indies vs South Africa: 27 मे रोजी झालेल्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने आफ्रिकन संघाचा 8 गडी राखून पराभव केला.
West Indies vs South Africa: आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 (ICC T20 World Cup) ची स्पर्धा 2 जूनपासून सुरु होणार आहे. ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत रंगणार आहे. याआधी वेस्ट इंडिज (West Indies) आणि दक्षिण अफ्रिकेत (South Africa) 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळली गेली. या मालिकेत वेस्ट इंडिजने दक्षिण अफ्रिकेला अस्मान दाखवत 3-0 अशा फरकाने मालिका जिंकली.
27 मे रोजी झालेल्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने आफ्रिकन संघाचा 8 गडी राखून पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने प्रथम खेळताना 163 धावा केल्या होत्या, मात्र वेस्ट इंडिज संघाने 37 चेंडू बाकी असताना 8 विकेट्स राखून सामना जिंकला. ब्रँडन किंगच्या नेतृत्वाखाली टीमने 3-0 ने मालिका जिंकून विश्वचषक उंचवण्याची तयारी केली आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीर पूर्णपणे अपयशी ठरले. क्विंटन डी कॉक आणि रीझा हेंड्रिक्ससह अनेक फलंदाज अयशस्वी ठरले. कर्णधार व्हॅन डर ड्युसेनने 31 चेंडूत 51 धावांची अर्धशतकी खेळी खेळली, ज्यात त्याने 1 चौकार आणि 5 षटकार ठोकले. दुसरीकडे लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या कॅरेबियन संघाला ब्रँडन किंग आणि जॉन्सन चार्ल्स यांनी झंझावाती सुरुवात करून दिली. किंगने 28 चेंडूत 44 धावा केल्या, तर चार्ल्सच्या 26 चेंडूत 69 धावांच्या जलद खेळीने दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी हतबल झाली. या दोघांमध्ये ९२ धावांची भागीदारी झाली. विश्वचषकापूर्वी काईल मायर्सही चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले, त्याने 23 चेंडूत 4 षटकार मारताना 36 धावा केल्या. तत्पूर्वी, दोन्ही सामन्यात प्रथम फलंदाजी करत वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेला धावसंख्या रोखण्यापासून रोखले होते.
Signed, sealed & delivered.✅️
— Windies Cricket (@windiescricket) May 26, 2024
WI win with a 3️⃣-0️⃣ series sweep!#WIREADY #WIvSA pic.twitter.com/60lEjnG4aM
मालिका विजयानंतर कर्णधाराने व्यक्त केला आनंद
ब्रँडन किंग दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत वेस्ट इंडिजचे नेतृत्व करत होते. मालिका विजयानंतर तो म्हणाला, विश्वचषकापूर्वी मालिका 3-0 ने जिंकणे चांगले आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी आमची तयारी चांगली आहे आणि आम्ही चांगल्या स्थितीत आहोत हे यावरून दिसून येते. आमचे गोलंदाज चमकदार कामगिरी करत आहेत आणि सर्वकाही सातत्यपूर्ण आहे, चांगलं चाललंय, असं ब्रँडन किंगने सांगितले. दरम्यान विश्वचषकात वेस्ट इंडिजचे नेतृत्व रोवमन पॉवेलकडे असेल, जो आयपीएल 2024 मुळे या मालिकेचा भाग होऊ शकला नाही.
विश्वचषकासाठी पात्र ठरलेले 20 संघ...
अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा
कोणत्या गटामध्ये कोणते संघ
अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ