(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर झालं तरीही पाकिस्तानचा ख्वाडा, आयसीसीला आशा कायम
Pakistan in Cricket WC 2023 : पाकिस्तानला झटका देत आयसीसीने आज विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा केली.
Pakistan in Cricket WC 2023 : भारतात होणाऱ्या विश्वचषकाचे वेळापत्रक आयसीसीने आज जाहीर केले. 5 ऑक्टोबरपासून स्पर्धेचा थरार सुरु होणार आहे. पाकिस्तान भारतात होणाऱ्या विश्वचषकात सहभागी होणार की नाही ? याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. पाकिस्तानचा संघाला सरकारकडून भारतात जाण्यासाठी अद्याप परवानगी मिळाली नाही, असे पीसीबीने सांगितेलय. तर आयसीसीच्या मते बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघ भारतात होणाऱ्या विश्वचषकात सामील होईल.
मुंबईमध्ये आज आयसीसीने वनडे विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर यादरम्यान स्पर्धा रंगणार आहे. पाकिस्तानने चेन्नई आणि बेंगलोर येथे होणाऱ्या सामन्यावर आक्षेप घेत ठिकाण बदलण्याची मागणी केली होती. अफगाणिस्तानविरोधात फिरकीला मदत करणाऱ्या चेन्नईमध्ये आणि बेंगलोरमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात खेळण्यास पाकिस्तानने नकार दिला होता. आयसीसी आणि बीसीसीआयने पाकिस्तानची मागणी फेटाळत वेळापत्रक जारी केले आहे. 15 ऑक्टोबर रोजी भारताविरोधात अहमदाबादमध्ये, 20 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरोधात बेंगलोर आणि 23 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानविरोधात चेन्नई येथे पाकिस्तानचे सामने होणार आहेत. या सामन्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आक्षेप घेतला होता. वेळापत्रकाची घोषणा झाल्यानंतर पीसीबीने भारतात येण्याबाबत अद्याप आम्हाला सरकारकडून परवानगी मिळाली नसल्याचे सांगितलेय. वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात जाण्यासाठी अद्याप परवानगी मिळाली नसल्याचे पीसीबीने वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर सांगितलेय. पण पाकिस्तान भारतात खेळण्यासाठी येईल, अशी आशा आयसीसीला आहे. सर्व संघाना त्यांच्या देशाच्या कायद्यांचे पालन करावे लागेल आणि आम्ही त्याचा आदर करतो. परंतु आम्हाला विश्वास आहे की विश्वचषकासाठी पाकिस्तान भारतात येईल, असे आयसीसीने म्हटलेय.
अहमदाबादमध्ये 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्यासाठी आणि सेमीफायनलमध्ये गेल्यास मुंबईमध्ये खेळण्यासाठी आम्हाला अद्याप सरकारकडून परवानगी मिळाली नाही, असे पीसीबीने सांगितलेय. भारतात जाण्यासाठी आम्हाला सरकारकडून अद्याप परवानगी मिळाली नाही. कारण हा एक संवेदनशील मुद्दा आहे. सरकारकडून आम्हाला परवानगी मिळाल्याशिवाय आम्ही कोणत्याही निर्णयापर्यंत पोहचू शकत नाही. सरकारच्या परवागगीनंतरच आमचा संघ भारतात येईल, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
भारतात जाण्यासाठी आम्हाला सरकारची परवानगी मिळालेली नाही, हे आम्ही आधीच आयसीसीला कळवले आहे. आमचा सहभाग किंवा ठिकाणांवरील कोणतीही समस्या नाही. असेही अधिका-याने सांगितले. दरम्यान, पाकिस्तानसह सर्वच देशांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठीच्या करारावर याआधी सह्या केलेल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तान विश्वचषकासाठी भारतात येईल, असे आयसीसीच्या सर्वच सदस्यांना वाटतेय. सर्व संघाना त्यांच्या देशाच्या कायद्यांचे पालन करावे लागेल आणि आम्ही त्याचा आदर करतो. परंतु आम्हाला विश्वास आहे की विश्वचषकासाठी पाकिस्तान भारतात येईल, असे आयसीसीने म्हटलेय. 2016 मध्ये पाकिस्तिनचा संघ टी 20 विश्वचषक खेळण्यासाठी भारतात आला होता.
आणखी वाचा :
World Cup 2023 : विश्वचषकाचे वेळापत्रक एका क्लिकवर, पाहा कोणत्या मैदानावर रंगणार सामने
पाकिस्तानला झटका, अहमदाबादच्याच मैदानावर रंगणार भारत-पाकिस्तानचा थरार
ICC Cricket WC 2023: विराट कोहलीसाठी विश्वचषक जिंका - वीरेंद्र सेहवाग