Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Akola Crime Hidayat Patel Murder : राज्यात खोपोली, सोलापूरमधील हिंसाचाराच्या घटना ताज्या असतानाच हिदायत पटेलांच्या हत्या झाली. या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

अकोला : जिल्ह्यातील काँग्रेसचा मुस्लिम चेहरा अशी ओळख असलेल्या हिदायत पटेल यांची हत्या करण्यात आली. त्यांच्याच गावातील उबेद पटेल या तरुणाने दिवसाढवळ्या त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या मागे पूर्ववैमनस्य, कौटुंबिक वाद हे कारण सांगितलं जात असलं तरी याची टायमिंग बघता राजकीय वाद हे कारण असू शकतं असं बोललं जातंय.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खरं तर शांततेत होतील अशी अपेक्षा असते. मात्र पद, पैसा, प्रतिष्ठा, राजकीय भवितव्य पणाला लागल्याने या निवडणुकांमध्ये सुद्धा हिंसाचार वाढू लागला आहे. याच हिंसेत अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांना आपला जीव गमवावा लागला.
Akola Crime Hidayat Patel Murder : राजकीय आणि कौटुंबिक वादातून हत्या
अकोट तालुक्यातील मोहाळा या त्यांच्या गावातच, मशिदीत मंगळवारी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. राजकीय आणि कौटुंबिक वादातून उबेद पटेल या तरूणाने चाकूने त्यांच्यावर घाव केले. बुधवारी उपचारादरम्यान अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.
हिदायत पटेल यांच्या हत्येला आणखी एका हत्येची पार्श्वभूमी आहे. 2019 च्या लोकसभेचा निकाल लागल्यानंतर हिदायत पटेल यांच्या मोहाळा गावात राजकीय वादातून भाजप कार्यकर्ते मतीन पटेल यांची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणात हिदायत पटेल यांच्यासह 10 जण आरोपी होते. हिदायत पटेल यांची हत्या करणारा आरोपी उबेद हा मतिन पटेल यांचा पुतण्या आहे.
हिदायत पटेल यांचं पार्थिव अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनं समोर ठेवण्यात आलं. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह येथून हलवणार नाही अशी भूमिका नातेवाईक आणि हजारोंच्या जमावानं घेतली. पोलिसांना समोर येऊन तपासाचे अपडेट सांगावे लागले. आतापर्यंत सहा आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उबेद पटेलच्या सोबत इतर आरोपींमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बद्रूजम्मा, अकोटचे माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेस नेते संजय बोडखे, काँग्रेस नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजीव बोचे यांचा समावेश आहे.
Hidayat Patel Profile : कोण होते हिदायत पटेल?
- अकोल्यातील काँग्रेसचा मोठा मुस्लिम चेहरा.
- अकोला जिल्हा काँग्रेसचे आठ वर्ष जिल्हाध्यक्ष.
- प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष.
- जिल्ह्यातील मोठे सहकार नेते.
- 25 वर्षांपासून जिल्हा बँकेचे संचालक.
- अकोट तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष.
- 35 वर्षांपासून अकोट बाजार समितीचे संचालक, माजी सभापती.
- 2014 आणि २2019 मध्ये काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार.
- 2014 मध्ये दुसऱ्या तर 2019 मध्ये तिसऱ्या स्थानावर होते.
राज्यात खोपोली, सोलापूरमधील हिंसाचाराच्या घटना ताज्या असतानाच हिदायत पटेलांच्या हत्या झाली. त्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला.हे कमी की काय म्हणून मुंबईच्या वांद्र्यात शिवसेना उमेदवार हाजी सालिम कुरेशी यांच्यावर प्रचारादरम्यान चाकू हल्ला करण्यात आला. राजकारणाचा हा खेळ जीवघेणा आणि रक्तरंजित बनतोय हेच या वाढत्या घटनांवरुन लक्षात येईल.
ही बातमी वाचा:






















