IND vs WI, 3rd T20 : आज भारत वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा टी-20 सामना, वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप देण्याचा भारताचा प्रयत्न
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज तिसरा टी-20 सामना होणार आहे. भारताने तीन सामन्यांची टी-20 मालिका आधीच जिंकली आहे. भारताचा आज वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न असणार आहे.
IND vs WI, 3rd T20 : आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा टी-20 सामना होणार आहे. भारताने तीन सामन्यांची टी-20 मालिका आधीच जिंकली आहे. भारताने 2-0 ने या मालिकेत आघाडी गेतली आहे. आज तिसराही सामना जिंकून भारत वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न करणार आहे. भारताने शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यांत वेस्टइंडिजचा 8 धावांनी पराभव केला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वातील सलग तिसऱ्या मालिकेत विजय भारताने हा विजय मिळवला. ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकाला आता फक्त आठ महिन्यांचा कालावधी राहिला आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा नवीन पर्याय वापरण्याचा या सामन्यात प्रयत्न करेल अशी शक्यता आहे.
के.एल राहुलच्या गैरहजेरीत ईशान किशन वरच्या फळीतील फलंदाजीत छाप पाडण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे आयपीएलचा ऑरेंज कॅप होल्डर ऋतुराज गायकवाडला संघात स्थान मिळू शकते. आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरल्यानंतर टी-20 मालिका खेळणाऱ्या ईशानने आतापर्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. त्याला मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने 15 करोड 25 लाख रूपयांना खरेदी केले आहे. पहिल्या सामन्यात 42 चेंडूत 35 धावा केल्यानंतर ईशानला दुसऱ्या सामन्यात 10 चेंडूत केवळ 2 धावा करता आल्या.
भारतीय संघाने सलग दोन विजयांसह मालिका आधीच जिंकली आहे. आज होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताला प्रयोगाची संधी आहे. या सामन्यात श्रेयस अय्यर आणि महाराष्ट्राचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यांना भारतीय संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने शुक्रवारी झालेला दुसऱ्या टी-20 सामना आठ धावांनी जिंकत तीन सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी प्राप्त केली आहे. हा भारताचा आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील शंभरावा विजय ठरला. या कामगिरीनंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत या दुसऱ्या सामन्यातील अर्धशतकवीरांना 10 दिवसांची विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी श्रेयस आणि ऋतुराज यांना संधी मिळू शकते.
संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, सूर्यकुमार यादव, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, यजुवेंद्र चहल, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा, कुलदीप यादव, हरप्रीत ब्रार.
वेस्ट इंडिज : किरॉन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन, शाय होप, डॅरेन ब्राव्हो, रॉस्टन चेस, ब्रँडन किंग, रोव्हमन पॉवेल, कायले मेयर्स, जेसन होल्डर, फॅबियन अॅलन, शेल्डन कॉट्रेल, डॉमिनिक ड्रेक्स, अकील हुसेन, रोमारियो शेपर्ड, ओडीन स्मिथ, हेडन वॉल्श.