IND vs PAK : हार्दीक पांड्याने रन करावे म्हणून म्हणून संपूर्ण संघ प्रार्थना करत होता, सामन्यानंतर भुवनेश्वरनं केला खुलासा
IND Vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दीक पांड्याने गोलंदाजी तसंच फलंदाजी अशा दोन्हीमध्ये कमाल कामगिरी करत भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला.
India Vs Pakistan : रविवारी पाकिस्ताविरुद्धच्या सामन्यात भारतानं 5 विकेट्सनी रोमहर्षक असा विजय मिळवला. यावेळी विजयाचा शिल्पकार ठरला तो हार्दिक पांड्या (Hardik Pandya) त्याने गोलंदाजीत तर 3 विकेट्स घेतल्याच, पण फलंदाजीमध्ये 17 चेंडूत स्फोटक असा 33 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान पांड्याने अखेरच्या षटकापर्यंत झुंज देत विजय मिळला असून त्याच्या या धावांसाठी संपूर्ण भारतातील क्रिकेटप्रेमींसह स्वत: टीम इंडियाचे खेळाडूही प्रार्थना करत असल्याचा खुलासा भुवनेश्वर कुमारनं (Bhuvneshwar Kumar) केला आहे.
हार्दिक पांड्याने सामन्यात कमाल असं अष्टपैलू प्रदर्शन करत भारताच्या विजयात मोलाचा हातभार लावला. त्याने आधी गोलंदाजी करताना 4 ओव्हरमध्ये 25 रन देत 3 विकेट्स घेतले. तर फलंदाजीत महत्त्वपूर्ण 33 धावा केल्या, ज्यात अखेरच्या षटकातील चौथ्या चेंडूवर षटकार ठोकून त्याने सामना भारताला जिंकवून दिला. त्याच्या या कामगिरीचं सर्वत्रच कौतुक होत असून सामन्यानंतर भुवनेश्वर कुमार म्हणाला.''10 ओव्हरनंतर सामना फार अटीतटीचा होत गेला. अशी स्थिती होती की सामना कुणाच्याही बाजूने झुकला असता. पण हार्दीक आणि जाडेजाने ज्याप्रकारे डाव सावरला, ते उल्लेखणीय आहे. हार्दीकने रन करावे म्हणून सर्वजण प्रार्थना करत होते.''
भुवीची दमदार गोलंदाजी, पाकिस्तानची फलंदाजी ढासळली
भुवनेश्वर कुमारने आपल्या गोलंदाजीनं पाकिस्तानच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं. त्यानं आपल्या स्पेलमध्ये 26 धावा खर्च करून पाकिस्तानच्या चार फलंदाजाला पव्हेलियनचा रस्ता दाखवत भारताच्या विजयाचा पाया रचला . त्यानं पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, आसिफ अली, शादाब खान आणि नसीम शाह यांना बाद केलं. या दमदार गोलंदाजीनंतर तो पाकिस्तानविरुद्ध टी20 मध्ये भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजी करणारा गोलंदाज बनला आहे.
हार्दिक पांड्या काय म्हणाला?
"अशा लक्ष्याचा पाठलाग करताना तुम्ही नेहमी ओव्हर बाय ओव्हर प्लॅन करता. मला माहित होतं की, समोर एक तरुण गोलंदाज आहे आणि डावखुरा फिरकीपटू देखील आहे. अखेरच्या षटकात माझ्यापेक्षा गोलंदाज जास्त दडपणाखाली असेल. मी जास्त प्रेशर घेतला नाही. आम्हाला शेवटच्या षटकात फक्त 7 धावा हव्या होत्या. एवढंच नव्हे तर, अखरेच्या षटकात 15 धावां काढायच्या असत्या तरीही मी ते केलं असतं.
भारताचा पुढील सामना आता 31 ऑगस्ट रोजी हाँगकाँग संघाविरुद्ध दुबई आंतरराष्ट्रीय मैदानात होणार आहे.