Team India Head Coach: गौतम गंभीर नव्हे, व्हीव्हीएस लक्ष्मण सांभाळणार टीम इंडियाची धुरा?; महत्वाची अपडेट आली समोर
Team India Head Coach: राहुल द्रविडनंतर मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची निवड होणार, याबाबत अधिकृत काही माहिती समोर आलेली नाही.
Team India Head Coach: गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची (Team India Head Coach) चर्चा रंगली आहे. सध्या भारतीय संघ टी-20 विश्वचषकात खेळत आहे. या विश्वचषकानंतर राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. राहुल द्रविडनंतर मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची निवड होणार, याबाबत अधिकृत काही माहिती समोर आलेली नाही.
मीडिया रिपोर्ट्सनूसार भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरचं (Gautam Gambhir) नाव मुख्य प्रशिक्षकपदासाठी निश्चित झालं आहे. परंतु याचदरम्यान एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. गौतम गंभीरच्या आधी भारतीय संघाचा माजी खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman)मुख्य प्रशिक्षकपदाचा कारभार सांभाळणार आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण आणि त्याचा राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) मधील सपोर्ट स्टाफ 6 जुलैपासून झिम्बाब्वे येथे सुरू होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय संघात सामील होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गौतम गंभीर त्याच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीला श्रीलंका दौऱ्यापासून सुरुवात करेल.
भारत झिम्बाब्वेविरुद्ध रंगणार मालिका-
या देशांतर्गत हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. T20 विश्वचषक 2024 संपल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी भारत झिम्बाब्वेला भेट देणार आहे. 6 जुलै ते 14 जुलै दरम्यान दोन्ही संघांमध्ये 5 टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह संघातील अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.
जॉन्टी रोड्स यांचा फिल्डिंग कोचसाठी अर्ज-
दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू आणि महान क्षेत्ररक्षक जॉन्टी रोड्स यांनी भारतीय संघाचे फिल्डिंग कोच होण्यासाठी अर्ज केला आहे. त्यांनी 2019 लादेखील फिल्डिंग कोचसाठी अर्ज केला होता. मात्र त्यावेळेचे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आर. श्रीधर यांना पहिली पसंती दिली होती. सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी टी. दिलीप यांची फिल्डिंग कोच म्हणून निवड केली होती. जॉन्टी रोड्स सध्या लखनौ सुपर जायंट्सचे फिल्डिंग कोच आहेत.
गौतम गंभीरचं आंतरराष्ट्रीय कारकीर्द -
गौतम गंभीरचं आंतरराष्ट्रीय करियर शानदार राहिलेय. त्यानं टीम इंडियासाठी 147 व-नडे सामने खेळले आहेत, त्यामध्ये 5238 धावा केल्या आहेत. वन-डेमध्ये गौतम गंभीरने 11 शतके आणि 34 अर्धशतके ठोकली आहेत. गौतम गंभीर टीम इंडियासाठी 58 कसोटी सामने खेळलाय, यामध्ये 4154 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये गौतम गंभीरने 9 शतके आणि 22 अर्धशतके ठोकली आहेत. कसोटीमध्ये गौतम गंभीरने द्विशतकही ठोकलेय. गौतम गंभीर याने 37 टी 20 सामनेही खेळले आहेत. यामद्ये 932 धावा केल्या आहेत. त्याने यादरम्यान सात अर्धशतके ठोकली आहेत. 2007 टी20 वर्ल्डकप आणि 2011 वनडे वर्ल्डकप विजयात गौतम गंभीरचाही मोठा वाटा राहिला आहे.