SL vs SA: दक्षिण आफ्रिकेचा धमाका,पहिल्याच मॅचमध्ये श्रीलंकेला दणका, सहा विकेटनं दणदणीत विजय
SL vs SA: दक्षिण आफिक्रेनं पहिल्याच मॅचमध्ये श्रीलंकेला 6 विकेटनं पराभूत केलं आहे. या मॅचमध्ये फलंदाज चौकार षटकार दूर राहिले, एका एका रन साठी संघर्ष करताना पाहायला मिळाले.
SL vs SA न्यूयॉर्क: दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात टी-20 वर्ल्ड कपमधील (T 20 World Cup 2024) चौथी मॅच पार पडली. दक्षिण आफ्रिकेनं 6 विकेटनं श्रीलंकेवर विजय मिळवला. आफ्रिकेनं श्रीलंकेला पराभूत करत विजयानं सुरुवात केली. क्विंटन डी कॉकनं 20 धावा आणि हेनरिक क्लासेननं 19 धावा करत दक्षिण आफ्रिकेच्या विजयात महत्त्वाचं योगदान दिलं. श्रीलंकेला पहिल्यांदा फलंदाजी करताना 77 धावा करता आल्या. श्रीलंकेकडून सर्वाधिक धावा कुसल मेंडिसनं केल्या. कुसल मेंडिसनं 19 धावा केल्या. तर आफ्रिकेच्या नॉर्टजेनं 4 विकेट घेतल्या.
दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात देखील चांगली झाली नाही. आफ्रिकेचे फलंदाज देखील एका एका रनसाठी संघर्ष करताना दिसून आले. दक्षिण आफ्रिकेपुढे विजयासाठी 78 धावांचं आव्हान होतं. मात्र, श्रीलंकेच्या गोलंदाजीसमोर हे आव्हान देखील दक्षिण आफ्रिकेसाठी मोठ्या धावसंख्येसारखं झालं होतं. दक्षिण आफ्रिकेनं पॉवर प्लेमध्ये रीजा हेंड्रिक्स आणि एडन मारक्रम या दोघांच्या विकेट गमावल्या होत्या. पॉवर प्लेमध्ये आफ्रिकेनं 2 विकेटवर 27 धावा केल्या होत्या.
यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉक आणि ट्रिस्टन स्टब्सनं 28 धावांची भागिदारी केली. ही आफ्रिकेच्या विजयात महत्त्वाची ठरली. आफ्रिकेनं 10 ओव्हरमध्ये 2 विकेटवर 47 धावा केल्या. यानंतर दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 10 ओव्हरमध्ये 31 धावा हव्या होत्या. यानंतर हसरंगाच्या बॉलिंगवर ट्रिस्ट स्टब्स 13 धावा करुन बाद झाला. यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या हातून मॅच निसटते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. त्याचवेळी हसरंगानं त्याच्या ओव्हरमध्ये 11 धावा दिल्या. त्यामुळं श्रीलंकेच्या विजयाच्या आशा संपल्या. डेव्हिड मिलरनं 17 व्या ओव्हरमध्ये चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला.
षटकार मारण्यासाठी फलंदाजांचा संघर्ष
टी20 क्रिकेटची ओळख आक्रमक फलंदाजी ही आहे. मात्र, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेतील मॅच कसोटी क्रिकेट सुरु असल्यासारखी वाटत होती. खेळपट्टीची स्थिती अशी होती की फलंदाजांना षटकारनं दूर राहिलं, एका एका रन साठी संघर्ष करावा लागत होता. श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेच्या डावात तीन तीन षटकार मारले गेले.
श्रीलंकेची टी-20 वर्ल्ड कपमधील सर्वात कमी धावसंख्या
श्रीलंकेचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 77 धावांवर बाद झाला. ही टी-20 वर्ल्ड कपमधील सर्वात कमी धावसंख्या ठरली. श्रीलंकेचा संघ यापूर्वी 2010 च्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 87 धावा केल्या होत्या.
संबंधित बातम्या :