T20 World Cup 2024 : आयसीसी पेटारा उघडणार, टी-20 वर्ल्ड कप विजेत्या संघावर पैशाचा पाऊस पडणार, किती कोटी मिळणार?
T20 World Cup 2024 : टी 20 वर्ल्ड कपला सुरुवात झाली असून आज श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मॅच होणार आहे. या मॅचपूर्वी आयसीसीनं बक्षिसांची रक्कम जाहीर केली आहे.

न्यूयॉर्क : वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 वर्ल्ड कप सुरु आहे. आतापर्यंत टी20 वर्ल्ड कपमध्ये तीन सामने पार पडले आहेत. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये 20 संघ सहभागी झाले आहेत. टी-20 वर्ल्ड कप सुरु झाल्यानंतर आयसीसीनं मोठा निर्णय घेतला आहे. टी-20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघांना किती रक्कम मिळणार याची घोषणा आयसीसीनं केली आहे.
टी-20 वर्ल्ड कप विजेत्या संघाला 20.36 कोटी रुपये मिळणार आहेत. तर, उपविजेत्या संघाला 10.64 कोटी रुपयांची रक्कम मिळणार आहे. आयसीसी बक्षीसापोटी एकूण 93.52 कोटी रुपयांची रक्कम खर्च करणार आहे.
आयसीसी टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या फेरीत 40 मॅचेस होणार आहेत. त्यानंतर सुपर 8 च्य मॅचेस होतील. पुढच्या टप्प्यात सेमी फायनल होईल आणि त्यानंतर अंतिम फेरीची लढत बारबाडोसमध्ये होणार आहे.
भारताचे सामने कधी?
भारतीय क्रिकेट संघानं 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद मिळवलं होतं. भारतीय संघाला 2007 नंतर पुन्हा विजेतेपद मिळवता आलेलं नाही. यावेळी टी-20 वर्ल्ड कपमध्ये 20 संघ सहभागी झाले आहेत. पाच संघांचा एक गट या प्रमाणं चार गटांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. भारत अ गटामध्ये असून भारताशिवाय पाकिस्तान, अमेरिका, कॅनडा आणि आयरलँड संघाचा समावेश आहे. भारताची पहिली मॅच 5 जूनला आयरलँड विरुद्ध न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमवर मॅच होणार आहे. याच स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात 9 जूनला लढत होणार आहे. या हाय व्होल्टेज लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भारताची यानंतरची लढत 12 जूनला अमेरिकेसोबत असेल. यानंतर 15 जूनला भारत आणि कॅनडा यांच्यात लढत होणार आहे.
भारत आयसीसी स्पर्धांच्या विजेतेपदाचा दुष्काळ संपवणार?
भारतानं 2013 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजेतेपद मिळवलं होतं. यानंतर गेल्या 10 वर्षांमध्ये भारताला आयसीसी स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवता आलेलं नाही. 2023 च्या आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. भारतीय संघ यावेळी टी-20 वर्ल्ड कप जिंकणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भारतीय संघानं नुकत्याच झालेल्या सराव सामन्यात बांगलादेशला 60 धावांनी पराभूत केलं होतं. आता भारतीय क्रिकेट संघ टी-20 वर्ल्ड कपमध्ये कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भारतीय संघानं स्वत: च्या क्षमतेवर विश्वास ठेवल्यास वर्ल्ड कपमध्ये त्यांना यश मिळेल.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
